‘सारथी’चं आंदोलन पुन्हा पेटण्याच्या मार्गावर, सरकारनं ठेंगा दाखवल्याचा आरोप
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारनं 'सारथी'साठी 80 कोटी रुपयांची घोषणा केली होती. पण 18 जानेवारीला सारथीला फक्त 25 टक्केच निधी मिळाला आहे.
पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था अर्थात सारथीचं आंदोलन पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप मराठा संघटनांनी केला आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारनं ‘सारथी’साठी 80 कोटी रुपयांची घोषणा केली होती. पण 18 जानेवारीला सारथीला फक्त 25 टक्केच निधी मिळाला आहे. तर एकूण 130 कोटी रुपयांपैकी अवघे 31 कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारनं सारथीला ठेंगा दाखवल्याचा आरोप करण्यात आलाय.(Maratha organizations accuse the state government of Sarathi Sanstha)
दरम्यान बुधवारी सकाळी 11 वाजता सारथी संस्थेत संचालक मंडळाची बैठक होणार आहे. तारादूतांच्या नियुक्ती प्रश्नावरही या बैठकीत चर्चा होईल. त्यापार्श्वभूमीवर बुधवारी राज्यभरातून तारादूत पुण्यातील सारथीच्या बैठकीला हजेरी लावणार आहे. महत्वाची बाब म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सारथी संस्थेबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला होता.
तारादूतांचा आत्मदहनाचा इशारा
बुधवारी होणाऱ्या सारथी संस्थेच्या बैठकीत प्रश्न सुटला नाही तर तारादूत 15 तारखेला तीव्र आंदोलन करणार आहेत. तर 19 तारखेला आत्मदहन करण्याचा इशारा तारादूतांकडून देण्यात आलाय. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या सारथीच्या बैठकीकडे मराठा समाजाचं लक्ष लागलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सारथीचं आंदोलन पुन्हा पेटण्याच्या मार्गावर असल्याचं पाहायला मिळत आहे.
‘महाज्योती’लाही स्वायत्तता द्या- ओबीसी नेते
सारथी संस्थेला पुन्हा स्वायत्तता बहाल करण्यात आल्यानंतर आता ओबीसी नेत्यांनी ‘महाज्योती’ संस्थेलाही स्वायत्तता देण्याची मागणी केली आहे. ओबीसी समाजाच्या लोकसंख्येनुसार या संस्थेला निधी मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली. राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या मागणीचे समर्थन केलं आहे.
ओबीसी समाजासाठीच्या ‘महाज्योती’ संस्थेला स्वायत्तता देण्याची मागणी रास्त आहे. राज्य सरकारने ओबीसी नेत्यांचा असंतोष लक्षात घेतला पाहिजे. ‘सारथी’प्रमाणे ‘महाज्योती’लाही स्वायत्तता देणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करू, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. त्यामुळे आता राज्य सरकार यावर काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापला होता. त्यावेळी मराठा समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘सारथी’च्या स्वायत्ततेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. छत्रपती संभाजीराजे यांनी मुद्द्यावरून महाविकासआघाडी सरकारला धारेवर धरले होते. ‘सारथी’चे पंख छाटण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप त्यांनी केला होता.
संबंधित बातम्या :
SARTHI Meeting: सारथी संस्थेला 8 कोटींची मदत, अजित पवारांची घोषणा, वादावर पडदा
‘सारथी’चा पंख छाटण्याचा प्रयत्न, सरकारने दुटप्पी भूमिका सोडावी, संभाजीराजे आक्रमक
राजा रयतेचा असतो, तलवार कुणाविरोधात उपसणार? वडेट्टीवारांचा संभाजीराजेंना सवाल
Maratha organizations accuse the state government of Sarathi Sanstha