भोर, पुणे : पुण्यातल्या भोर तालुक्यातील भोलावडे गावात भीषण आगीची (Massive Fire) घटना घडली. या आगीत 4 शेतकऱ्यांची घर संपूर्ण जळून खाक झाली आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र आगीत 4 शेतकऱ्याचे सुमारे 15 लाखांचे नुकसान झाल आहे. स्थानिक नागरिक, अग्निशामक दलाचे जवान (Firebrigade) आणि सह्याद्री रेस्क्यू टीम यांनी जवळपास तीन तास अथक प्रयत्न केले. त्यानंतर ही आग आटोक्यात आली. कालिदास आवाळे, बबन आवाळे, सुनील आवाळे, विजया आवाळे, सुभाष आवाळे अशी घरे जळालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. वेल्डिंग (Welding) काम सुरू असताना त्याची ठिणगी घराशेजारच्या गोठ्यात साठवलेल्या चाऱ्यावर पडली आणि त्यानंतर ही आग लागली आणि पाहता पाहता या आगीने भीषण रूप धारण केले.
भोरमधील भोलावडे गावात कालिदास आवाळे यांच्या घराशेजारी वेल्डिंगचे काम सुरू होते. त्याची ठिणगी घराशेजारी असणाऱ्या गोठ्यात साठवलेल्या जनावरांच्या चाऱ्यावर पडली. लगेल त्याने पेट घेतला. त्यानंतर लागलेल्या आगीने भीषण रुप धारण केले आणि बघता बघता शेजारी असणारी इतर तीन घरेदेखील आगीच्या भक्षस्थानी पडली. धुराचे लोट दिसू लागल्यानंतर गावकऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीचे प्रमाण अधिक असल्याने गावाकऱ्यांचे प्रयत्न अपुरे पडले.
अग्नीशामक दलाची गाडी दाखल झाल्यानंतर अग्निशामक दलाचे जवान, सह्याद्री रेस्क्यू टीम आणि गावकऱ्यांच्या मदतीने तब्बल तीन तासानंतर ही आग आटोक्यात आली. मात्र यात जनावरांच्या चाऱ्याबरोबरच, अन्न धान्य, कपडे, घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. शेतकऱ्यांचे सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान या आगीमुळे झाले आहे. कालिदास आवाळे, बबन आवाळे, सुनील आवाळे, विजया आवाळे,सुभाष आवाळे अशी घर जळालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. आगीमुळे या शेतकरी कुटुंबांचा संसारच उघड्यावर आला आहे. त्यामुळे त्वरित पंचनामे करून शासनाकडून मदत मिळावी, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे.