मुंबई : मुंबईमध्ये म्हाडा लॉटरी (MHADA Lottery 2022 Mumbai) दिवाळीमध्ये निघणार आहे. दिवाळीत मुंबईच्या तीन हजार घरांची लॉटरी निघेल. तर येत्या काही दिवसांत म्हाडा पुणे (MHADA Lottery 2022 Pune) विभागासाठी घरांची सोडत काढणार आहे. यात तब्बल साडेचार हजारपेक्षा जास्त घरं असणार आहेत. पुण्यासह पिंपरी चिंचवड, ताथवडे, कोल्हापूर, सोलापूर या भागातील घरांचा सोडतीमध्ये समावेश करण्यात आलाय. म्हाडाचे (Mhada News) पुणे विभागाचे अधिकारी असलेल्या नितीन माने पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पुणे विभागासाठी तब्बल 4 हजार 744 इतक्या घरांची सोडत काढली जाणार आहेत. येत्या काही दिवसांत त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर गृहस्वप्न साकार करण्याचं स्वप्न पाहिलेल्यांना लॉटरीसाठी अर्ज भरता येऊ शकेल.
गेल्या दोन वर्षांत म्हाडाने काढलेली पुणे विभागातली ही चौथी सोडत आहेत. तर गेल्या काही वर्षांत पुणे म्हाडा विभागाकडून अनेक सोडती जाहीर करण्यात आल्यात. आता काढली जाणारी ही दहावी सोडत असणार आहेत. पुणे म्हाडा विभागात घर घेण्यासाठी मुंबई पुण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील अनेकजण इच्छुक असण्याची शक्यताय. आता अनेकांना यासाठीची जाहिरात कधी निघते याची प्रतिक्षा आहे.
दरम्यान, अंबरनाथमध्ये म्हाडाकडून टाऊनशीपही उभारण्यात येणार आहे. ही राज्यातली सगळ्यात मोठी टाऊनशीप असेल. त्यासाठी चिखलोली धरणाला लागून असलेल्या तब्बल 200 एकर जागेचा सर्वेही करण्यात आलेला आहे.
मुंबई उपनगरातील वाढती लोकसंख्या पाहता, डोंबिवली आणि कल्याणच्या पुढे अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये पर्यायी टाऊनशिप उभारण्याचा विचार केला जातोय. त्यातूनच अंबरनाथमध्ये सगळ्यात मोठी टाऊनशिप उभारण्यासाठीचे प्रयत्न सुरु झाले आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत माहिती दिली.
किंमत आवाक्यात असल्यानं अनेकांची म्हाडाच्या घरांना पसंती असते. तसंच म्हाडाचं घर हे विश्वासार्हही मानलं जातं. त्यामुळे अनेकांची पसंती म्हाडाच्या सोडतीमधील घर खरेदीला असते. आता वेगवेगळ्या लॉटरीतून म्हाडाच्या घरांना नेमका कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचंय.