Pune : समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी पुण्यातल्या मिलिंद एकबोटे, नंदकिशोर एकबोटेंना जामीन तर मंजूर, पण कोर्टानं घातली अट…
दोन्ही आरोपींना गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल होत नाही तोपर्यंत पुणे महानगरपालिकेच्या (PMC) हद्दीत प्रवेश करता येणार नसल्याची अट टाकण्यात आली आहे. दरम्यान, जामीन मंजूर झाल्यानंतर एकबोटे यांनी शरद पवार तसेच प्रकाश आंबेडकर यांच्यावर हल्लाबोल केला होता.
पुणे : मिलिंद एकबोटे, नंदकिशोर एकबोटे यांना अटकपूर्व जामीन (Bail) मंजूर झाला आहे. मात्र पुणे शहरात प्रवेश करता येणार नाही. दिशाभूल करणारी पत्रके वाटून दोन समाजात तेढ, द्वेष निर्माण व्हावा, यासाठी प्रयत्न केल्याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana police station) समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे, नंदकिशोर एकबोटे यांच्यासह 20 जणांवर गुन्हा दाखल आहेत. अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शरयू सहारे यांनी एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. यावेळी त्यांना पुणे महापालिकेच्या क्षेत्रात प्रवेश न करण्याची अट घालण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल होत नाही तोपर्यंत पुणे महानगरपालिकेच्या (PMC) हद्दीत प्रवेश करता येणार नसल्याची अट टाकण्यात आली आहे. दरम्यान, जामीन मंजूर झाल्यानंतर एकबोटे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यावर हल्लाबोल केला होता.
विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल
मिलिंद एकबोटे (वय 65, रा. रेव्हेन्यू कॉलनी, शिवाजीनगर) आणि नंदकिशोर एकबोटे (वय 60, रा. शिवाजीनगर) यांच्याविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात कलम 120 (ब), 295(अ), 143, 145, 149, 188, 505 (2), माहिती तंत्रज्ञान अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अटक करण्यात येवू नये, यासाठी एकबोटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता, त्यावर सुनावणी झाली.
फेटाळला अर्ज
अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करतेवेळी न्यायालयाने जी अट घातली आहे, ती रद्द करण्यात यावी, यासाठी एकबोटे यांनी अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी करण्यात आली. तपास अधिकारी, सरकारी वकील तसेच आरोपीचे वकील यासर्वांचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने बुधवारी नंदकिशोर एकबोटे यांचा अर्ज फेटाळून लावला. तसेच अटकपूर्व जामीन मंजूर करताना दोषारोपपपत्र दाखल होत नाही, तोवर महापालिकेच्या हद्दीत प्रवेश करता येणार नसल्याची अट घातली.