मोठी बातमी! शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार खरंच होणार की नाही? बच्चू कडू यांचं मोठं विधान
आमदार बच्चू कडू यांनी आज मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे शिंदे सरकारचा दुसरा टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार खरंच होणार की नाही? किंवा फक्त 20 मंत्री राज्याचा कारभार चालवणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय.
पुणे : आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) हे त्यांच्या रोखठोक स्वभावामुळे ओळखले जातात. बच्चू कडू यांनी आज पुण्यात दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल मोठं वक्तव्य केलं. राज्यात सत्तांतर होऊन आता नऊ महिने होत आली आहेत. पण तरीही राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) अद्याप पार पडलेला नाही. मंत्रिमंडळ विस्तारावरुन बच्चू कडू यांनी याआधीदेखील अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदारांमध्येही याबाबत असलेली धुसफूस अनेकदा समोर आलेली आहे. असं असताना मंत्रिमंडळाचा विस्तार होताना दिसत नाही. याबाबत आज बच्चू कडू यांना विचारलं असता बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं.
बच्चू कडू हे महाविकास आघाडीच्या काळात राज्यमंत्री होते. पण सत्तांतरानंतर ते मंत्री होतील. त्यासाठीच ते गुवाहाटीला गेले होते, अशी दबक्या आवाजात चर्चा होती. या चर्चांनंतर स्वत: बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तार होत नाही म्हणून जाहीरपणे नाराजी देखील व्यक्त केलेली. त्यामुळे बच्चू कडू यांनी शिंदे गट आणि भाजपला घरचा आहेर दिल्याची चर्चा होती. असं असताना बच्चू कडू यांनी आज मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “आमचे 20 मंत्री सक्षम आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्ताराची गरज नाही. लोकांची तक्रार नाही. 20 मंत्र्यांमध्ये सुद्धा मंत्रिमंडळ चालू शकतं. हे या सरकारने दाखवून दिलं”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
बच्चू कडू यांची महाविकास आघाडीवर टीका
यावेळी बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजीनगर येथील वज्रमूठ शभेवरही प्रतिक्रिया दिली. “सभेने मत जिंकली जातात, असं नाही. सभा ही फक्त शक्ती प्रदर्शनासाठी असते. शक्ती प्रदर्शनासोबत कर्तव्याची जोड पाहिजे. तुमचं कर्तव्य जर नसेल तर सभेला काहीच किंमत नाही. काम बघून लोकं मत देतात सभा पाहून नाही. महविकास आघाडीचं कर्तृत्व शून्य आहे”, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.
सावरकर गौरव यात्रेवर बच्चू कडू यांचं परखड मत
भाजपच्या सावरकर गौरव यात्रेबद्दल प्रश्न विचारला असता “तो माझा छंद नाही आणि धंदा नाही. महापुरुषांना राजकारणात आणू नये. आपली तेवढी बोलायची कुवत आहे का हे पाहावे?”, असा सवाल त्यांनी केला. यावेळी त्यांना बागेश्वर बाबांच्या साईबाबा यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला असता “बागेश्वर महाराज मोठे की साईबाबा मोठे? कुणीही असं बोलतं असेल तर कारवाई झालीच पाहिजे”, असं परखड मत त्यांनी व्यक्त केलं.
बच्चू कडू यांची महागाईवर प्रतिक्रिया
“कांदा स्वस्त झाला तर शेतकरी बोलतात आणि कांदा महाग झाला तर तुम्ही मीडियावाले बोलता. माझं मत आहे महागाई वाढली तर वाढू द्या. जे गरीब आहेत त्यांना स्वस्त धान्य दुकानातून द्या”, असं मत बच्चू कडू यांनी महागाईवर मांडलं.