Raj Thackeray | अद्या, पद्या, शेळ्या, मेंढ्या अशा नावाने एकमेकांना हाक मारू नका; राज ठाकरे यांनी टोचले कलाकारांचे कान
Raj Thackeray on Marathi Actors : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांना त्यांच्यात आणि बाहेर राज्यातील कलकारांमधील फरक दाखवून दिला आहे. अखिल भारतीय नाट्य संमेलनात ते बोलत होते.
पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांचे कान टोचलेत. मराठी कलाकार एकमेकांना मान देत नाहीत. बाहेर राज्याच्या कलावंतांना भेटल्यावर मला काही चुका दिसल्याचं म्हणत राज ठाकरेंनी खंत बोलून दाखवली. पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे अखिल भारतीय नाट्य संमेलन सुरू आहे. मुलाखतकार दीपक करंजीकर यांनी मुलाखत घेतली. यावेळी मराठी कलाकारांना एक सल्ला दिला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
तुम्ही वाईट घेऊ नका. मला एक गोष्ट सांगायची आहे. बाहेरच्या राज्याच्या कलावंताना भेटतो. त्यात मला काही चुका दिसतात. माझ्यावर विश्वास ठेवा. मी मराठी कलावंतांची बैठक बोलावणार होतो. आज सर्व कलावंत इथे आहे. मी जे बोलतो ते कृपा करून ऐका. पहिली गोष्ट आणि शेवटची गोष्ट. तुम्ही एकमेकांना मान दिला नाही. तुम्ही एकमेकांसमोर अद्या पद्या शेळ्या मेंढ्या अशा नावाने हाक मारत राहिला. पष्प्या आलाय. अंड्या आलाय. हे तुम्ही ऑन स्टेज लोकांसमोर बोलता, असं राज ठाकरे म्हणाले.
आज मराठी चित्रपटक्षेत्रात पाहिलं तर स्टार नाही. कलावंत आहेत. मराठी सिनेमाला स्टार नाही. तामिळ तेलगू घ्या तिथे स्टार आहे. महाराष्ट्रात स्टार होते. आजही अनेक कलावंतात सर्व गुण आहेत. आपण एकमेकांना पब्लिकमध्ये शॉर्टफॉर्म नावाने हाक मारतात. अंड्या काय पचक्या काय. तुम्ही तुमचा मान राखला नाही तर लोक तुम्हाला का मान देतील, असा सवाल राज ठाकरेंनी केला.
मराठ्यांचा इतिहास पाहिला तर नाटक ते अटोक असा आहे. अटकेपार झेंडे रोवले आपण. महाराष्ट्रातील मराठी माणूस इतिहास विसरत चालला आहे. टेलिव्हिजनमधून पाहत राहणं, मोबाईल फोन आणि रिल्समध्ये सर्वच अडकले आहेत. तुम्ही राज्यकर्ते होता. हिंद प्रांताचे राज्यकर्ते होतो आपण. या देशाचा पंतप्रधान मराठा साम्राज्याने बसवला. एवढा इतिहास असतानाही आपण ते गमावून बसलो आहोत. आपल्या हातून सर्व गोष्टी जात आहे. जातीपातीत भांडत आहोत. जातपात राजकारणापर्यंत राहिली नाही ती नाटकात आलीय. शाळा कॉलेजात आली असल्याचं राज ठाकरे म्हणाले.