Pune Vasant More : संवादच नाही त्यामुळे सुसंवादाचा विषयच नाही; पुण्यातले मनसे नेते वसंत मोरेंची जाहीर नाराजी, पक्षात पडले एकाकी
पोलीस आयुक्तांना आज भेटण्यासंदर्भातही आपल्याला कोणताही निरोप देण्यात आला नव्हता. फक्त ग्रुपवर सांगण्यात आले होते, राज ठाकरेंच्या आदेशानुसार. त्यामुळे आपण आल्याचे वसंत मोरे म्हणाले.
पुणे : पक्षात शहर पातळीवर मला टाळले जात आहे, अशी जाहीर नाराजी मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी व्यक्त केली आहे. मी कोणालाही टाळत नाही, मात्र मला टाळले जात आहे, असे ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर राज ठाकरे येतील तेव्हाच मी पक्ष कार्यालयात जाणार, असेही मोरे म्हणाले आहेत. शहराध्यक्ष पद गेल्यानंतर आज पहिल्यांदाच मोरे कोअर कमिटीसोबत पोलीस आयुक्तांना (Pune Police Commissioner) भेटायला आले होते. त्यावेळीही कोअर कमिटी आणि मोरे यांच्यात दुरावा दिसून आला. पक्षातील कार्यकर्ते आणि आपल्यात सुसंवाद काय संवादही नाही, अशी नाराजी त्यांच्या बोलण्यातून दिसून आली. एकूणच काय तर पुणे मनसेत (Pune MNS) वसंत मोरे सध्या एकाकी पडले आहेत. त्यांना इतर पदाधिकाऱ्यांची साथ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र असे असूनही आपण पक्षातच आहोत, राजमार्गावर आहोत, असे ते वारंवार सांगत आहेत.
पोलीस आयुक्तांना भेटले शिष्टमंडळ
लाऊडस्पीकरच्या प्रश्नावरून पुण्यातील मनसेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तर राज्यातील सर्व शहरांतील पदाधिकारीही स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना भेटत आहेत. मुंबई पोलीस आयुक्तांनी आवाजाबाबत जे पत्र काढले आहे तसेच पत्र पुणे पोलीस आयुक्तांनी काढावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जर पोलिसांनी याबाबत माहिती दिली नाही तर आम्ही पक्ष म्हणून निर्णय घेऊ, असा इशारा मनसेने यावेळी दिला आहे. दरम्यान, या शिष्टमंडळ आधी आयुक्तांना भेटले त्यानंतर वसंत मोरे पोहोचले. त्यामुळे ते शिष्टमंडळासोबत उशिरा पोहोचल्याचे पाहायला मिळाले. त्यावर विचारले असता पार्किंगला जागा मिळाली नाही, अशी सारवासारव त्यांनी केली.
‘निरोप नव्हता’
पोलीस आयुक्तांना आज भेटण्यासंदर्भातही आपल्याला कोणताही निरोप देण्यात आला नव्हता. फक्त ग्रुपवर सांगण्यात आले होते. राज ठाकरेंच्या आदेशानुसार. त्यामुळे आपण आल्याचे वसंत मोरे म्हणाले. पक्षातल्या कुठल्याच पदाधिकाऱ्याशी संवाद नसल्याची नाराजीही त्यांच्या बोलण्यातून दिसून येत होती. तर राज ठाकरे आल्यानंतरच पक्ष कार्यालयात जाणार, असेही त्यांनी सांगितले.