Pune Vasant More : कालच्या हनुमानाच्या महाआरतीचं कौतुक, पुण्यात राज ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरेंची प्रतिक्रिया
राज ठाकरे मुंबईला निघण्याआधी वसंत मोरे त्यांची भेट घेणार आहेत. राज ठाकरे यांचे निवासस्थान राजमहाल याठिकाणी ते जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. नाराजीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये काय चर्चा होते, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
पुणे : कालची आरती चांगली झाली. या आरतीचे राज ठाकरे यांनी कौतुक केले, अशी प्रतिक्रिया मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी सांगितले आहे. सध्या राज ठाकरे पुण्यात आहेत. त्यांच्या वैयक्तिक कामासाठी ते पुण्यात आहेत. आज मुंबईला ते रवाना होतील. तर काल संध्याकाळी मनसे नेते आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी हनुमानाची महाआरती (Hanuman Maha-aarti) केली होती. मात्र यावेळी राज ठाकरे हजर नव्हते. आता राज ठाकरे मुंबईला निघण्याआधी वसंत मोरे त्यांनी त्यांची भेट घेतली. राज ठाकरे यांचे निवासस्थान राजमहाल याठिकाणी जाऊन त्यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आरती चांगली झाल्याचे सांगत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपले कौतुक केले, असे वसंत मोरे म्हणाले. त्याचबरोबर राज ठाकरे लवकरच वेळ देणार आहेत, असेही वसंत मोरे यांनी सांगितले आहे.
मनसे आंदोलनात कुठेच दिसले नाहीत वसंत मोरे
सध्या मनसे हनुमान चालिसा तसेच मशिदीवरील भोंग्यांवरून आक्रमक आहे. यात वसंत मोरे यांनी वेगळी भूमिका घेतली होती. त्यांच्या पक्ष सोडण्याच्याही चर्चांना उधाण आले होते. मात्र आपण राजमार्गावर असल्याचे सांगत त्यांनी त्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. मनसेच्या अलिकडील कोणत्याच आंदोलनात ते दिसले नाहीत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यात नाराजी दूर झाल्याचेच दिसून आले आहे.
‘सेनापतीच गैरहजर’, काल उघडपणे व्यक्त केली होती नाराजी
पुण्यात मनसे नेते वसंत मोरे यांनी आयोजित केलेल्या कात्रजमधील हनुमानाच्या महाआरतीला मनसेप्रमुख राज ठाकरेच गैरहजर राहिले. या कार्यक्रमात राज ठाकरे गैरहजर राहिल्याने वसंत मोरे यांनी जाहीर भूमिका घेत या लढाईत सेनापतीच कुठे दिसले नाहीत, असे म्हटले होते. तर आझाद मैदानात झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याची भाषा केल्यानंतर त्यांच्या पक्षातील पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी उघड-उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या या नाराजीमुळे मनसेकडून त्यांच्यावर टीका सहन करावी लागली होती. या टीकानाट्यानंतर खालकर चौकात झालेल्या महाआरतीला वसंत मोरे गैरहजर राहिले होते.