मला पाठिंबा द्या, तुमचा एक आमदार वाढेल; कसब्यातील ‘या’ उमेदवाराची थेट राज ठाकरे यांना ऑफर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार दिले नाहीत. तसेच कुणालाही पाठिंबा दिला नाही. याशिवाय कोणत्या उमेदवाराच्या प्रचारात सामील होऊ नका.
पुणे: कसबापेठ विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट होणार आहे. या निवडणुकीत वंचित आघाडीने आपला उमेदवार दिला नाही. तसेच राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसेनेही उमेदवार दिला नाही. राज ठाकरे यांनी तर पुढील आदेश येईपर्यंत कुणाच्याही निवडणूक प्रचारात भाग घेऊ नये असे आदेशच कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी नाट्यामुळे घेरलेल्या भाजपची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच हिंदू महासभेचे नेते आनंद दवे यांनीही उमेदवारी अर्ज भरल्याने हिंदू मतांमध्ये फूट पडणार असून त्याचाही भाजपला फटका बसण्याची चिन्हे आहेत. आनंद दवे यांनी तर आपल्याला पाठिंबा द्या. तुमचा एक आमदार वाढेल अशी ऑफरच थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिली आहे. त्यामुळे राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मनसेने मला पाठिंबा द्यावा. मनसेचा एक आमदार वाढेल, असं आवाहन हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी केली आहे. दवे यांनी थेट राज ठाकरे यांच्याकडे ही मागणी केली आहे. राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांनी कोणाचाही प्रचार करू नये असा आदेश काढला आहे. पण राज ठाकरे आणि आमच्या भूमिका सारख्याच आहेत. त्यांचं आणि आमचं हिंदुत्व आक्रमक आहे. आरक्षणाची भूमिकाही सारखीच आहे. त्यामुळे राज यांनी आम्हाला पाठिंबा द्यायला हवा, असं आनंद दवे यांनी म्हटलं आहे.
तटस्थ राहून फायदा नाही
मनसे आणि हिंदू महासंघाच्या भूमिकेतील समानतेचे आनंद दवे यांनी आणखीही दाखले दिले आहेत. समर्थ रामदास स्वामी आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्याबाबत आमची मते सारखीच आहेत. मनसेने कसबा निवडणूकीत मला पाठिंबा दिला तर माझा विजय सुकर होईल.
माझं मताधिक्य वाढेल. इतर कोणत्याही पक्षाबरोबर जाऊन किंवा तटस्थ राहून मनसेला काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी याचा विचार करावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
मुस्लिम मते नकोच
दरम्यान, आनंद दवे यांनी कालपासून प्रचाराला सुरुवात केली. कसबा विधानसभेसाठी आम्हाला फक्त हिंदूंची मते हवी आहेत. आमचा हिंदू मतांवर विश्वास आहे. हिंदू समाज सोडून आम्ही इतर कुठल्याही मतदारापर्यंत पोहोचणार नाही किंवा त्यांना मतदानाचं आवाहन देखील करणार नाही. आम्ही कुठल्याही मुस्लिम मतदाराच्या घरापर्यंत पोहोचणार नाही. आम्ही फक्त हिंदूंची मते घेऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं.
राज ठाकरे यांचं आवाहन काय?
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार दिले नाहीत. तसेच कुणालाही पाठिंबा दिला नाही. याशिवाय कोणत्या उमेदवाराच्या प्रचारात सामील होऊ नका. आदेश येईपर्यंत कुणाचाही प्रचार करू नका, असे आदेशच राज ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे राज ठाकरे आगामी काळात काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.