राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; यवतमाळमध्ये बैलगाडीसह महिला पुरातून वाहून गेली; सोलापुरात पिकांचे प्रचंड नुकसान
राज्यात येत्या 48 तासात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून 5 ते 11 ऑगस्ट या काळात राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सध्या सोलापूर, यवतमाळ आणि वाशिमसह परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली असून सोलापूर जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूरस्थिती आली आहे.
पुणेः राज्यात येत्या 48 तासात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून 5 ते 11 ऑगस्ट या काळात राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची (Heavy Rain) शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सध्या सोलापूर, यवतमाळ आणि वाशिमसह परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली असून सोलापूर जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूरस्थिती (Flood the river) आली आहे. हवामान खात्याकडून कोकण, गोवा, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्याबरोबरच मुंबईतही 7 आणि 8 ऑगस्टला मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात (Yawatmal Mahagaon) काळी टेंभी येथील नाल्याला आलेल्या पुरामध्ये गाडी बैलांसह महिला वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचं क्षेञ तयार झाल्याने राज्यात पुन्हा मान्सुनचं पुनरागमन होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर बंगालच्या उपसागरात येत्या 48 तासात नव्या कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्याने विदर्भ मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे.
बार्शी तालुक्यात मुसळधार
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बार्शी तालुक्यातील नदी आणि ओढ्यांची पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे.
बार्शी ते तुळजापूर रस्ता वाहतुकीसाठी बंद
घोर ओढ्याला आलेल्या पाण्यामुळे बार्शी ते तुळजापूर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. बार्शी शहर आणि तालुक्यात दोन दिवसांपासून एकूण 128 मी.मी पावसाची नोंद झाली आहे. काल अक्कलकोटमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते, त्यानंतर आता बार्शीमध्येदेखील मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.
विजेच्या कडकडासह यवतमाळमध्ये जोरदार
यवतमाळ जिल्ह्यातही आज मुसळधार पावसाने अनेक नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ केली आहे. विजेच्या कडकडासह जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. 15 दिवसांच्या उघडीपीनंतरपुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने् अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आज दिवसभर ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात येत होती, तर दुपारी चार वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
शेतीचे प्रचंड नुकसान
गेल्या अकरा दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर यवतमाळमधील शेतकरी पुन्हा शेतीच्या कामात गुंतला होता मात्र आज पुन्हा पावसांने जोरदार हजेरी लावल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.