पुणे : राज्यभरातील शेतकरीच नाही तर देशभरातील बळीराजा पावसाची वाट पाहत आहे. बिपरजॉयने देशभरातील पाऊस पळवला आहे. बिपरजॉयमुळे दोन दिवसांपूर्वी गुजरात अन् राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर आला होता. त्याचवेळी देशातील अनेक भागात उष्णतेची लाट होती. आता जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु होणार आहे. या आठवड्यापासून देशभरात मान्सूनची थांबलेली वाटचाल सुरु होणार आहे. आता आगामी चार आठवडे पाऊस कसा असणार? याची महत्वाची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
राज्यात अन् देशात २३ जूनपासून मान्सून सक्रीय होणार आहे. येत्या 23 जूनपासून पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात पाऊस मुसळधार पाऊस पडणार आहे. तसेच 24 ते 25 जूनपर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पहिल्या आठवड्यात म्हणजे २३ ते २९ जून दरम्यान मध्य भारतात चांगला पाऊस पडणार आहे. दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच ३० ते ६ जुलै दरम्यान मान्सून भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर सक्रिय राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ७ ते १३ जुलै अन् १४ ते २० जुलै या दोन आठवड्यात मान्सून देशभरात सक्रीय राहणार आहे. यामुळे जुलै महिना पावसाचा असणार आहे, असा अंदाज आहे. यंदा जून महिन्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्वत्र पेरण्याही खोळबंल्या आहेत.
विदर्भात मान्सून आगमनाचा १३ वर्षांचा विक्रम तुटला आहे. विदर्भात मान्सून २३ जूनपासून दाखल होणार आहे. परंतु संपूर्ण विदर्भ व्यापण्यास आणखी चार ते पाच दिवस लागणार आहे, असा अंदाज नागपूर हवामान विभागाकडून वर्तवला आहे. उद्यापासून म्हणजेच २३ जूनपासून विदर्भाच्या काही भागात पूर्व मोसमी पावसाचा अंदाज नागपूर हवामान विभागाने वर्तवण्यात आला. यंदा पाऊस लांबल्यामुळे विदर्भातील खरीप पेरणीचं गणित बिघडण्याची शक्यता आहे.