पुणे : गेल्या पंधरा दिवसांपासून मान्सूनची वाट पाहणाऱ्या शेतकरी अन् सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारी बातमी आहे. मान्सून आता सक्रीय होऊ लागला आहे. दरवर्षी राज्यात ७ जून रोजी दाखल होणारा मान्सून यंदा कोकणात ११ जूनपासून थांबला होता. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास लांबला होता. परंतु आता मान्सूनची प्रगती सुरु झाली आहे. येत्या दोन दिवसांत राज्यात सर्वत्र मान्सून दाखल होणार आहे. पुढील चार आठवड्यात देशात सर्वत्र पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
केरळपासून मान्सूनची वाटचाल सुरु होते. आता कर्नाटक, तेलंगणा अन् आंध्र प्रदेशातील बहुतांश भागात मान्सून पोहचला आहे. तसेच महाराष्ट्रातील विदर्भ, ओडिसा अन् छतीसगडच्या काही भागांत मान्सून दाखल झाला आहे. तसेच झारखंड, बिहार अन् उत्तर प्रदेशातील काही भागांतही मान्सून पोहचणार आहे.
अमरावती जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यंदा मान्सून लांबल्याने बळीराजा चिंतेत होता मात्र अमरावती जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्याने शेतकरी सुखावला आहे. तसेच पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.
23/06: SW Monsoon further advanced to some more parts of Karnataka,Telangana,remaining parts of Andhra Pradesh,some parts of #Vidarbha, Chhattisgarh,remaining parts of NW BoB,remaining parts of Odisha & GWB,some more parts of Jharkhand & Bihar & some parts of East UP today
IMD— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 23, 2023
कोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी राधानगरी धरण क्षेत्रात पावसाने हजेरी लावली. यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला चांगलाच दिलासा मिळाला आहे. यंदा मान्सून लांबल्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याच जिल्ह्यावर संकट निर्माण झाले होते. मात्र सलग दुसऱ्या दिवशी आलेल्या पावसाने सुखद गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. पुढच्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात मान्सून पूर्ण क्षमतेने सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत आज पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त होत आहे. गेले काही दिवस पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले होते. आता कोकणात 24 तासात मान्सूनचा पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात जूनमध्ये नीच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वीस वर्षातला सर्वात यावर्षी जूनमध्ये सर्वात कमी पाऊस झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात २२ जून अखेरीस अवघ्या ५८ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात रत्नागिरीत सरासरी ८०० मिलिमीटर पाऊस होत असतो.