पुणे | 9 ऑक्टोंबर 2023 : महाराष्ट्रात यंदा मॉन्सून उशिराने दाखल झाला. नेहमी सात जून रोजी येणारा मॉन्सून यंदा तब्बल 25 जून रोजी आला. त्यानंतर जुलै महिन्यात पाऊस झाला. परंतु ऑगस्ट महिन्यात तब्बल 21 दिवस पाऊस सुट्टीवर होता. यामुळे शेतकरी वर्गासह प्रशासनही चिंतेत होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पुन्हा बऱ्यापैकी पाऊस झाला. परंतु जून आणि ऑगस्ट महिन्याची सरासरी मॉन्सून भरुन काढू शकला नाही. यामुळे यंदा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली नाही. आता मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला असून पुणे, मुंबईसह अर्ध्या राज्यातून मान्सून परतला आहे.
महाराष्ट्रात या आठवड्याच्या सुरुवातीलाच आणखी काही भागातून मॉन्सून परतणार आहे. सध्या पुणे, मुंबई, कोकणासह अन्य भागातून पाऊस परतला आहे. शनिवारपर्यंत निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सून वाऱ्यांनी माघार घेतली आहे. त्यानंतर रविवारी मॉन्सून वारे जैसे थे होते. आता पुन्हा परतीचा प्रवास सुरु करणार आहेत. महाराष्ट्राच्या आणखी काही भागांसह अन्य राज्यांमधून मॉन्सून परतण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याची माहिती पुणे हवामान विभागाकडून देण्यात आली.
राज्यातून मॉन्सून परतल्यामुळे ऑक्टोंबर हिट जाणवू लागली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील कमाल तापमान वाढले आहे. पुणे शहरातील तापमान वाढल्यामुळे पुणेकर घामाघूम होत आहे. दुपारी उन्हाचे चटके जाणवत असताना संध्याकाळी तापमान कमी होत असल्यामुळे गारवा राहत आहे. राज्यात सध्या कुठेही पावसाची शक्यता नाही. चार, पाच दिवसानंतर पावसाची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात आठवडाभर चांगला पाऊस झाला. या काळात मुसळधार पावसानंतर अचानक तापमान वाढले. तापमान वाढीचा मोठा फटका फ्लॉवर पिकाला बसला आहे. फ्लॉवरचे पीक शेतातच खराब झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली जात आहे.