पुणे | 26 सप्टेंबर 2023 : राज्यात यंदा उशिराने मान्सून दाखल झाला. दरवर्षी ७ जून रोजी येणारा मान्सून यंदा २५ जून रोजी दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. त्यानंतर जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. परंतु ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली. यामुळे सर्वच क्षेत्रात चिंता व्यक्त होऊ लागली होती. परंतु सप्टेंबर महिन्यात पुन्हा जोरदार पाऊस झाला. यामुळे राज्यात पुन्हा मान्सून सरासरी गाठण्याची शक्यता आहे. आता मान्सूनचा परतीचा प्रवासाचे वेध लागले आहे. राजस्थानमधून मान्सूनने उशिरानेच परतीचा प्रवास सुरु केला.
नैर्ऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनने राजस्थानमधून परतीचा प्रवास उशिराने सुरु केला आहे. मान्सून राजस्थानमधून १७ सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरु करतो. परंतु यंदा उशिराने २५ सप्टेंबरपासून मान्सूनने परत फिरण्यास सुरुवात केल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिली आहे. या वर्षी देशात मान्सूनने २ महिने आणि २३ दिवस आपला मुक्काम केला. आता राजस्थानमधून नौखरा, जोधपूरमधून परत जाण्यासा सुरुवात केली आहे. मान्सूनने २०२१ मध्ये ६ ऑक्टोबरपासून परतीचा प्रवास सुरु केला होता. तर २०२२ मध्ये २० सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरु केला होता.
महाराष्ट्रातून ५ ऑक्टोबरपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली. राजस्थानमधून मान्सून माघारी फिरत असला तरी राज्यातून अजूनही सक्रीय आहे. २६ सप्टेंबर रोजी राज्यात धुळे, नंदुरबार जिल्हा वगळता सर्वत्र यलो अलर्ट दिला. कोकण, विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे धरणांमधील जलसाठाही वाढला आहे. त्यामुळे आता पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपला आहे.
पुणे जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून दमदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे पुणे परिसरातील धरणे भरली आहे. यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला असताना शेतीला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. गणेशोत्सवात झालेल्या पावसामुळे शेतकरी समाधानी दिसत आहेत.