Pune cyclist : अनोख्या रेकॉर्डमुळे पुण्याच्या सायकलिस्ट प्रीती म्हस्केंचं नाव गिनीज बुकात..! लेह-मनाली खडतर प्रवास यशस्वीरित्या पूर्ण
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि WUCA रेकॉर्डसाठी लेह ते मनाली हा मार्ग आव्हानात्मक आहे. भूप्रदेशाची उंची आणि सतत बदलत असलेले हवामान यामुळे विक्रम करणे आव्हानात्मक होते. हा विक्रम 55 तास, 13 मिनिटे आणि 0 सेकंदात पूर्ण करू शकलो, असे त्यांनी आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये सांगितले.
पुणे : दोन मुलांची आई असलेल्या महिलेने सायकलिंगमध्ये अनोखे रेकॉर्ड (Cycling record) केले आहे. 56 तासांपेक्षा कमी वेळेत लेह ते मनाली सायकल चालवून हे रेकॉर्ड करण्यात आले आहे. या कामगिरीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही (Guinness World Records) नोंद झाली आहे. प्रीती म्हस्के असे या दोन मुलांची आई असलेल्या सायकलिस्टचे नाव आहे. त्या पुण्यातील आहेत. लेह ते मनाली असा प्रवास त्यांनी एकट्याने पूर्ण केला आणि जागतिक विक्रमाला गवसणी घातली. 22 जून रोजी लेहपासून मनालीपर्यंत सायकलिंग सुरू केलेल्या प्रीती म्हस्के (Priti Mhaske) यांनी 430 किलोमीटरहून अधिक अंतर कापून शुक्रवारी 55 तास 13 मिनिटांत आपले ठिकाण गाठले. विक्रम करण्यासाठी त्यांच्याकडे 60 तासांचा अवधी होता. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने त्यांना हे आव्हान पूर्ण करण्यासाठी 60 तासांचा अवधी दिला होता.
बीआरओने दाखवला हिरवा झेंडा
प्रीती म्हस्के यांच्या या प्रवासाला 22 जून रोजी लेहमध्ये बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO)चे मुख्य अभियंता ब्रिगेडियर गौरव कार्की यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि 24 जून रोजी मनाली येथे BROच्या 38 बॉर्डर रोड टास्क फोर्सचे कमांडर कर्नल शबरिश वाचाली यांनी स्वागत केले.
‘मार्ग आव्हानात्मक’
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि WUCA रेकॉर्डसाठी लेह ते मनाली हा मार्ग आव्हानात्मक आहे. भूप्रदेशाची उंची आणि सतत बदलत असलेले हवामान यामुळे विक्रम करणे आव्हानात्मक होते. हा विक्रम 55 तास, 13 मिनिटे आणि 0 सेकंदात पूर्ण करू शकलो, असे त्यांनी आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये सांगितले.
View this post on Instagram
बीआरओकडून कौतुक
शाब्बास प्रीती मस्के… जागतिक अल्ट्रा सायकलिंग रेकॉर्डचा यशस्वी प्रयत्न केला. प्रीती यांनी लेह ते मनालीपर्यंतची 480 किमीची अवघड सायकलिंग मोहीम 55 तास 13 मिनिटांत पूर्ण केली. त्यांनी अत्यंत प्रतिकूल हवामानात चार पर्वतीय मार्ग पार केले, असे ट्विट करत बीआरओने म्हटले.
Well Done- Ms Preeti Maske.
World Ultra Cycling Record successfully attempted. Ms Preeti completed the arduous 480 km Cycling Expedition from Leh to Manali in 55 hrs 13 minutes. She crossed four mountain passes under extreme weather conditions. pic.twitter.com/LfyH6A35yK
— ?????? ????? ???????????? (@BROindia) June 25, 2022
आधीही अनेक विक्रम नावावर
या मॅरेथॉन सायकलिंग मोहिमेदरम्यान प्रीती यांची एकूण उंची 26 हजार फुटांपेक्षा जास्त होती. 2017मध्ये सायकल चालवल्यानंतर 45 वर्षीय प्रीती यांनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. डिसेंबर 2019मध्ये त्यांनी इतर दोन सायकलपटूंसोबत काश्मीर ते कन्याकुमारी सायकलिंग मोहीम 17 दिवस 17 तासांत पूर्ण केली होती. 3773 किलोमीटर सायकलिंग केली आणि सर्वात जलद पूर्ण करण्याचा समूह विश्वविक्रम केला.
‘आवड जपण्यासाठी वय अडथळा नाही’
नाशिक ते अमृतसर (पंजाब) हे 1600 किलोमीटरचे अंतर 5 दिवस आणि 5 तासांत सायकल चालवत पूर्ण केले तेदेखील याच महिन्यात, आणि हा मार्ग यशस्वीपणे पूर्ण करणारी एकमेव महिला सायकलपटू त्या ठरल्या. मार्च 2021मध्ये त्यांनी पूर्व-पश्चिम उत्तर दक्षिण मुंबई-चेन्नई-कोलकाता-दिल्ली-मुंबई असे 24 दिवस आणि 6 तासांत गिनीज रेकॉर्डसह गोल्डन क्वाड्रलेटरल 6000 किमी सायकलिंग पूर्ण केले. दरम्यान, तुमची आवड जपण्यासाठी वय हा अडथळा नाही, असे त्यांनी आपल्या यशाबद्दल सांगितले.