खासदार झाल्यानंतर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात काय बोलणं झालं?
Supriya Sule on Sunetra Pawar : बारामतीतील लढतीनंतर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात बातचित झाली का? या दोघींमध्ये काय बोलणं झालं? या दोघींमधल्या नात्यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. पुण्यात माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? वाचा सविस्तर...
लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ… या मतदारसंघातील लढतीची देशभरात चर्चा झाली. सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी ही लढत झाली. यात सुप्रिया सुळे विजयी झाल्या. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली. त्यांची बिनविरोध निवडही झाली. या सगळ्या राजकीय घडामोडींदरम्यान पवार कुटुंबियांचे कौटुंबिक संबंध कसे आहेत? यांच्यात आजही संवाद आहे का? असे प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. यांचं उत्तर सुप्रिया सुळे यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना दिलं आहे. सुनेत्रा पवार यांच्यासोबत काय बोलणं झालं? यावर सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
सुनेत्रा पवार या राज्यसभेवर निवडून आल्यानंतर मी त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र मला शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा फोन आलेला नाही. त्यांचा जर फोन आला तर मी घेईलच. असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. सुनेत्रा वहिनी पवार या जर केंद्रात मंत्री झाल्या तर तुम्ही त्यांना शुभेच्छा द्याल का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावरअर्थातच मी तर सर्वांनाच शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांपासून ते त्यांच्या 72 मंत्र्यांना मी त्याच दिवशी शुभेच्छा दिल्या आहेत, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.
नणंद-भावजय ही लढाई तुमच्या लोकांसाठी असेल. पण माझ्यासाठी ही लढाई इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए अशी लढाई होती. मी वैयक्तिक व्यक्तीशी आयुष्यात कधीच लढत नाही. मी सर्व जनतेचे आभार मानते. लोकांनी दिलेला हा जो कल होता तो भारतीय जनता पार्टीच्या आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या विरोधात आहे. एनडीएच्या विरोधात आहे. हे दिसत आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
विधानसभेच्या जागावाटपावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा होत आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोण कोठून लढणार हा अद्याप विषय झालेला नाही. 25 आणि 28 तारखेच्या दरम्यान महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स यांची एक मुंबईत मिटींग होईल. त्यानंतर सीट वाटपाचा फॉर्म्युला तयार होईल. यानंतर कोण कुठून लढणार हे फिक्स होईल, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.