18 तासानंतर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन स्थगित, मागण्या मंजूर झाल्या?; आंदोलन मागे घेण्याचं कारण काय?
एमपीएससीची यंत्रणा आता मूक आणि बधीर झाली आहे. न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात देखील एमपीएससीचे अधिकारी खोटे बोलतात.
पुणे: आपल्या विविध मागण्यांसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं आंदोलन अखेर मागे घेतलं आहे. तब्बल 18 तासानंतर पुण्यातलं एमपीएससीच आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्या आश्वासनानंतर पुण्यातल्या अलका टॉकीज चौकातलं आंदोलन विद्यार्थ्यांकडून स्थगित करण्यात आलं. या विद्यार्थ्यांची उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट होणार आहे. यावेळी ते मुख्यमंत्र्यांकडे आपल्या मागण्या ठेवणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलं होतं. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात या आंदोलनाचं लोण पसरलं होतं. पुणे, नाशिक आणि औरंगाबादमध्ये शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने केली होती.
त्याची अखेर दखल घेण्यात आली आहे. तसेच या विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घडवून देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी तूर्तास आंदोलन मागे घेतलं आहे.
उद्या पाच विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पुण्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. यावेळी हे विद्यार्थी मुख्यमंत्र्यांसमोर आपल्या मागण्या मांडणार आहेत. आंदोलन स्थगित म्हणजे स्वल्पविराम आहे. पूर्णविराम नाही, असा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या या आंदोलनावर प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन झालं होतं. पण अवघ्या चार ते पाच तासात लाईव्ह येऊन विद्यार्थ्यांशी बोलून त्यांनी तोडगा काढला होता. आता देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी संवेदनशील भूमिका घेणे आवश्यक आहे, असं असीम सरोदे म्हणाले.
एमपीएससीची यंत्रणा आता मूक आणि बधीर झाली आहे. न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात देखील एमपीएससीचे अधिकारी खोटे बोलतात. तुम्ही अचानक परीक्षा पद्धत कशी काय बदलू शकता? तुम्हाला तो अधिकार नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या मान्य होतील का याचा अंदाज घ्यायला हवा, असं सरोदे यांनी म्हटलं आहे.
लोक रस्त्यावरून मागणी करतात तेव्हा सरकारने त्वरित तोडगा काढणे आवश्यक असते. सरकार विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. एकनाथ शिंदे प्रत्येक वेळेस व्हिडिओ कॉल करतात. करा आता व्हिडिओ कॉल. मुलं बोलायला तयार आहेत. मुख्यमंत्री रात्री 3 वाजेपर्यंत काम करतात मग आता झोपले आहेत का? असा सवाल सरोदे यांनी केला.