पुणे | 21 सप्टेंबर 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) राज्यातील वर्ग एक, वर्ग २ आणि वर्ग ३ च्या भरतीसाठी परीक्षा घेतल्या जातात. राज्यातील लाखो तरुण या परीक्षा देतात. त्यातील काही जणांचे सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण होते. या MPSC चे सूत्र सांभाळणारे आयोगाचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर बुधवारी सेवानिवृत्त झाले. यामुळे आता या पदावर कोणाची नियुक्ती होते, याकडे राज्यातील एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आयोगाच्या अध्यक्षपदासाठी तीन नावांची फाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर सेवानिवृत्त होणार असल्यामुळे शासनाकडून नवीन अध्यक्षाची नियुक्तीची प्रक्रिया यापूर्वीच सुरु करण्यात आली. यासाठी मुख्य सचिव मनोज सैनिक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली होती. या समितीने तीन नावांची यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवली आहे. त्यात राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांचही नाव आहे. इतर दोन नावांमध्ये एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने, वन सेवेतील ज्येष्ठ निवृत्त अधिकारी प्रदीप कुमार यांची नाव असल्याची माहिती मिळाली आहे.
एमपीएससी अध्यक्षपदासाठी तीन नावांपैकी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यास नवीन पोलीस महासंचालक कोण होणार? हा प्रश्न आहे. त्यासाठी सध्या केंद्र सरकारच्या सेवेत असणाऱ्या रश्मी शुक्ला यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे. त्या जून २०२४ मध्ये सेवानिवृत्त होणार आहे.
किशोरराजे निंबाळकर यांच्या कार्यकाळात एमपीएससीचे मोठे काम झाले आहे. एक वर्ष ११ महिने ते आयोगाचे अध्यक्ष होते. आयोगाने २०२१ मध्ये २७५ जाहिराती दिल्या. त्यात ५०४७ मुलाखती घेतल्या गेल्या. २०२२ मध्ये १०८ जाहिराती दिल्या. तसेच ६५७६ मुलाखती घेतल्या. त्यात ७४१९ शिफारशी केल्या. आता २०२३ मध्ये ६० जाहिराती दिल्या असून १० हजार ५२९ मुलाखती घेतल्या आहेत. तसेच ९३३५ जणांची शिफारस केली आहे.