पुणे | 16 ऑक्टोंबर 2023 : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करुन सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न अनेक जण पाहत असतात. त्यासाठी स्पर्धा परीक्षेचा अर्ज भरण्यापूर्वीपासून रात्रंदिवस मेहनत करत असतात. स्पर्धा परीक्षेचा अर्ज दिलेल्या तारखेत भरतात. त्याच दरम्यान दुसऱ्या परीक्षेची जाहिरात येते. त्याचाही अर्ज आणखी एक संधी म्हणून भरला जातो. परंतु या परीक्षांच्या तारखा एकाच दिवशी आल्यास विद्यार्थ्यांची ही संधी जाते. आता तीन स्पर्धा परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे कोणता पेपर द्यावा…असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडला आहे. या परीक्षांचा तारखा बदलण्याची अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एमपीएससीची परीक्षा येत्या २९ ऑक्टोबर रोज होत आहे. त्याच दिवशी आणखी दोन परीक्षा होणार आहे. एमपीएससी पोलीस उपनिरीक्षक परीक्षेसोबत नगरपरिषद भारती परीक्षा आणि महाज्योतीतर्फे यूपीएससी प्रशिक्षणार्थ्यांसाठी घेतली जाणारी परीक्षाही २९ ऑक्टोंबर रोजी होणार आहे. तीन परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थी दोन परीक्षेला मुकणार आहे. यामुळे परीक्षेच्या वेळा पत्रकात बदल करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी तीन परीक्षांचे अभ्यास केला. परंतु तीन परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे त्यांची संधी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एमपीएससी परीक्षेचे वेळापत्रक आधीच निश्चित असते. त्यामुळे महाज्योती आणि नगरपरिषद भरतीच्या परीक्षेची तारीख बदलावी, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
राज्यातील तीन संस्था २९ ऑक्टोबर रोजी परीक्षा घेत आहेत. यामुळे परीक्षेची तारीख निश्चित करताना इतर संस्थांनी त्याच दिवशी पेपर घेतला आहे का? हे निश्चित करण्यासाठी विविध संस्थांमध्ये समन्वय होण्याची गरज आहे. एमपीएससीचे वेळापत्रक निश्चित असताना तो दिवस सोडून इतर दिवशी इतर संस्थांनी पेपर निश्चित केला असता तर विद्यार्थ्यांची संधी गेली नसती. यामुळे दोन परीक्षांच्या तारखा बदलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.