पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन सुरु आहे. नवीन अभ्यासक्रमासंदर्भात हे आंदोलन केले जात आहे. पुण्यात हजारो विद्यार्थी MPSC ची तयारी करत आहे. परंतु शासन आपले धोरण वारंवार बदलत असल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. हे विद्यार्थी आपल्या आयुष्याची कित्येक वर्ष सरकारी नोकरी मिळवण्यासाठी घालवतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी शासन दरबारी प्रयत्न सुरु केले. परंतु त्यांची दखल घेतली गेली नसल्याने हे आंदोलन केले जात.
काय आहे विद्यार्थ्यांची मागणी :
काही दिवसांपूर्वी MPSC नं परीक्षेच्या पॅटर्नमध्ये आणि अभ्यासक्रमामध्ये बदल केला. MPSC मंडळाने नवीन वर्षात म्हणजेच 2023 मध्ये संपूर्ण अभ्यासक्रम बदलून नवीन अभ्यासक्रम लागू केला. यामुळे गेल्या काही वर्षांपासून अभ्यास करणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. नवीन अभ्यासक्रमासंदर्भात त्यांना पुन्हा अभ्यास करावा लागणार आहे. या विद्यार्थ्यांचे जुन्या अभ्यासक्रमावर चांगला अभ्यास झाला होता. परंतु अचानक अभ्यासक्रम बदलल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार नाही आणि कित्येक वर्षांची मेहनत वाया जाईल. त्यामुळे हा नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात यावा अशी मागणी करत शुक्रवारी विद्यार्थी रस्त्यावर आले.
विद्यार्थ्यांना भविष्याची चिंता :
MPSC च्या परीक्षांमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून घोटाळे होत आहेत. उत्तर पत्रिकेत घोळ किंवा प्रश्नपत्रिकेत चूक होत असतात. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. यामुळे MPSC विरोधात आंदोलन करुन लक्ष वेधण्याचा प्रयत्न विद्यार्थी करत आहेत. परंतु शासनाकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनाही मुलांच्या भविष्याची काळजी वाटत आहे. अनेक विद्यार्थी शेती विकून एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करताय. परंतु वारंवार बदलणाऱ्या शासनाच्या धोरणाचा फटका त्यांना बसतोय.