Mumbai HC : न केलेल्या गुन्ह्याची 12 वर्षे भोगली शिक्षा! पुण्यातल्या दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यातून चौघांची मुंबई उच्च न्यायालयानं केली सुटका
पुण्यातील (Pune) दुहेरी हत्याकांडाच्या (Double murder) 12 वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मोठा निकाल दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तब्बल 12 वर्षांनंतर चार जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.
मुंबई : पुण्यातील (Pune) दुहेरी हत्याकांडाच्या (Double murder) 12 वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मोठा निकाल दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तब्बल 12 वर्षांनंतर चार जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. यापूर्वी या चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. प्रत्यक्षात या दुहेरी हत्याकांडात एकाचाही खून झाला नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले. या हत्येप्रकरणी चारही आरोपींना ट्रायल कोर्टाने 2015मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पुणे दुहेरी हत्याकांडातील चार जणांची निर्दोष मुक्तता न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पी. के. चव्हाण यांच्या खंडपीठाने केली. यापैकी तिघे कोविड-19 आपत्कालीन परिस्थितीत पॅरोल मिळेपर्यंत दशकाहून अधिक काळ तुरुंगात होते. तर चौथा खटल्यादरम्यान 2015मध्ये जामीन मिळवण्यात यशस्वी झाला, त्याने आणीबाणी पॅरोल मिळण्यापूर्वी पाच वर्षांची शिक्षा भोगली.
तपासले 18 साक्षीदार
अतिरिक्त सरकारी वकील वीरा शिंदे यांनी 2016मध्ये चार मजुरांनी त्यांच्या शिक्षेविरुद्ध दाखल केलेले अपील फेटाळण्याची मागणी करताना सांगितले, की मार्च 2010मध्ये दोन पीडित महिला आणि त्यांचा मित्र जेवणाच्या गाडीवर उभे असताना त्यांच्यावर तलवारी आणि दगडांनी हल्ला करण्यात आला. दोघांनाही रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. नंतर, पोलिसांनी कथित हल्लेखोरांना अटक केली, ज्यात चार मजुरांचा समावेश होता. त्यापैकी दोन 20 वर्षांचे होते आणि दोन 24 वर्षांचे होते. पुणे न्यायालयात खटल्यादरम्यान, 18 साक्षीदार तपासले गेले आणि सात आरोपींवर खटला चालवला गेला. डिसेंबर 2015मध्ये चौघांना हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आणि तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.