पुणे : दौंड तालुक्यातील यवत गावच्या हद्दीत बाजार तळाच्या जवळ कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी धारदार हत्याराने छातीवर आणि छातीच्या खालच्या बाजूस वार करून खून (Murder) केला होता. यात कसलाच पुरावा नसल्याने आरोपीला शोधणे अवघड झाले होते. यवत पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune rural police) मोठ्या शिताफीने शोध घेत आरोपीला नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेतले आहे. यानंतर आरोपीने गुन्हा कबूल केला असून मी पालखी स्थळावर बसलो असता मृतकाने दारू पिऊन मला शिवीगाळ केली आणि माझ्या कानाखाली चापट मारली म्हणून मी चिडून त्याच्या पोटात चाकू मारून खून केला, अशी कबुली दिली आहे. पोलिसांनी या आरोपीला अटक (Arrested) केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत (ता. दौंड) येथील पालखी तळाच्या जवळ 27 जूनला संजय बनकर (रा. तांबेवाडी, खामगाव, ता. दौंड, मूळ रा. सोलापूर) यांचा रात्रीच्या सुमारास पोटात चाकूचे वार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास यवत पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करीत होते. आरोपी राजबहाद्दूर बालुसिंग ठाकूर ऊर्फ राजू साथी (वय 47, रा. यवत, मूळ रा. पहाडीपुरा नेपाळ) यास नेपाळ येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना अटक केली.
पालखी तळावर दोघे जण बसले होते. त्यावेळी मृत संजय बनकर आणि आरोपी राजबहादूर ठाकूर यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर आरोपी राजबहादूरने रागाच्या भरात संजयच्या पोटात चाकूचे वार करून खून केला. या प्रकरणानंतर तो नेपाळयेथील मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत होता. यावेळी पोलिसांनी 5 ऑगस्टला सापळा लावून रेल्वे स्टेशन परिसरातून त्याला अटक केली.
न्यायालयाने आरोपीला 11 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, हवालदार नीलेश कदम, गुरूनाथ गायकवाड, नाईक अक्षय यादव, मारुती बराते, स्थानिक गुन्हे शाखेचे सचिन घाडगे, अजित भुजबळ, अजय घुले यांच्या पथकाने ही कारवाई केली.