अहमदनगर : नगरला रात्री लग्नाची वरात काढून डीजेच्या तालावर विनामास्क नाचणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोरोना प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष करत गर्दी जमवून अनेकांनी डीजेच्या तालावर ठेका धरला होता. याप्रकरणी वरपित्यासह डीजे चालकावर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच डीजेही जप्त करण्यात आलाय. (Nagar police Action Against who dance without masks)
नगर तालुक्यातील चास शिवारात अकोळनेर रस्त्यावर ही घटना घडली. लक्ष्मण नामदेव कार्ले यांच्या मुलाचे लग्न होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही डामडौल करत रात्री नवरदेवाची वरात काढली. यासाठी डीजे लावला गेला.
डीजेच्या गाण्यावर अनेकांनी गर्दी करून विनामास्क ताल धरला होता. पोलिसांना हे प्रकरण कळताच नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरिक्षक राजेंद्र सानप यांचे पथक दाखल झाले. पोलिसांना पाहून अनेकांची पळापळ झाली. मात्र पोलिसांनी विनामास्क नाचणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला.
अहमदनगर शहरात कोरोना वाढत असल्याने शहरातील गर्दीवर दक्षता पथकांचा वॉच राहणार आहे. तर पालिकेकडून चार पथकांची नियुक्ती करण्यात आली असून नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई होणार आहेय. तसेच कोरोना रुग्ण वाढत असल्याने शहरातील दहा ठिकाणी कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहे.
नगर शहरातील माणिकनगर, विनायक नगर, सारसनागर, केडगाव तसेच बोल्हेगाव येथे 3 तर सावेडी परिसरात 3 आशा 10 ठिकाणी मिनी कॅन्टेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता 28 मार्च पर्यंत याठिकाणी विविध निर्बंध घालण्यात आले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, या भागातील रहदारी आणि वाहने वापरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यावर संबंधितावर कायदेशीर कारवाई होईल, असे महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, बाहेर पडताना मास्क-सॅनिटायझर वापरावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून यात सरकारी कर्मचारी देखील आहेत. तर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना पाहून अनेकांची धावपळ उडालीय. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून महिनाभरात 83 लाख दंड वसूल करून 66 हजार नागरिकांवर कारवाई करण्यात आलीये. तर 15 दिवसात 16 हजार लोकांवर कारवाई तर 28 लाख दंड आकारण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितलं.
मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचे असल्याचं सांगत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन नागरिकांमध्ये जनजागृती केली. शिवाय नागरिकांना कोरोनाचे सगळे नियम पाळण्याचं आवाहन करत जे नागिरक नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा देखील देण्यात आलाय.
लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त गर्दी करू नये. त्यासाठी पोलिसांची मंगल कार्यालयात गस्त असणार आहे. गर्दी आढळल्यास यापुढील काही दिवस मंगल कार्यालय बंद केले जातील, असा इशाराही देण्यात आलाय.
(Nagar police Action Against who dance without masks)
हे ही वाचा :
नातीवर अत्याचार करणाऱ्या आजोबाला जन्मठेपेची शिक्षा
गळ्यात स्टीलचे पट्टे बांधून गुलाम बनवले, तरुणाने घरात 6 सेक्स स्लेव ठेवले, पोलिसांकडून सुटका