सर्वात मोठी बातमी, शरद पवार यांचा अत्यंत जवळचा नेता अजित पवार यांच्याकडे जाणार
महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे घडणाऱ्या घडामोडींना सध्याच्या घडीला जास्त महत्त्व आहे. कारण पडद्यामागे घडणाऱ्या घडामोडी जेव्हा पडद्यावर येतात तेव्हा अनेकांना आश्चर्याचा मोठा धक्का बसतो.
पुणे | 4 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महिन्याभरापूर्वी मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असे दोन गट पक्षात पडले आहेत. अजित पवार यांच्याकडे सर्वाधिक आमदारांचं बळ आहे. तर शरद पवार यांच्यासोबत काही आमदार आहेत. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या गटातील आमदारांची संख्या आणखी कमी होण्याची दाट शक्यता आहे. कारण काही आमदार हे अजित पवार यांच्या गटात सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामध्ये शरद पवार यांच्या अतिशय जवळचे आणि विश्वासू असेलेल्या नेत्याचा समावेश आहे. संबंधित नेता हा महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या काळात अतिशय महत्त्वाच्या पदावर होता.
महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे घडणाऱ्या घडामोडींना सध्याच्या घडीला जास्त महत्त्व आहे. कारण पडद्यामागे घडणाऱ्या घडामोडी जेव्हा पडद्यावर येतात तेव्हा अनेकांना आश्चर्याचा मोठा धक्का बसतो. गेल्या वर्षभरापासून असे प्रसंग सर्वसामान्यांच्या डोळ्यांसमोर आले आहेत आणि सर्वसामान्य जनतेला यावरुन अनेकदा आश्चर्याचे धक्के बसले आहेत. विशेष म्हणजे आता देखील अशा घडामोडी घडायच्या बाकी आहेत की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण सूत्रांकडून तशी माहिती मिळताना दिसत आहे.
तीन आमदार शरद पवार गटाची साथ सोडणार?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार गटातील तीन आमदार अजित पवार यांच्या गटात जाण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी पडद्यामागे खूप महत्त्वाच्या घडामोडी घडल्याची माहिती समोर येत आहे. तीन आमदार अजित पवार यांच्या पाठीमागे जाणार आहेत. या तिघांमध्ये शिराळा मतदारसंघाचे आमदार मानसिंग नाईक यांचा समावेश आहे. तर दुसरे आमदार हे महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे हे असल्याची माहिती मिळत आहे. तिसरं नाव अद्याप समजू शकलेलं नाही. पण तीन जण शरद पवार यांच्या गटाला सोडचिठ्ठी देवून अजित पवार यांच्या गटात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.
संबंधित तीनही आमदारांनी अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे आमदार लवकरच अजित पवार यांच्या गटात सहभागी होणार आहेत. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, राजेश टोपे हे अजित पवार यांच्या गटात जाणार असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा राजेश टोपे त्यांच्या ‘देवगिरी’ निवासस्थानी भेटीसाठी गेल्याची देखील माहिती समोर आली होती.