नव्या संसदेच्या उद्घाटनावेळी धर्मकांड, शरद पवार यांचा आक्षेप; म्हणाले, ते पाहिल्यानंतर आधुनिक…
संसदेचा सोहळा असल्यानंतर तो सर्वांना घेऊन करायला हवा होता. सर्वांच्या सहकार्याने करायला हवं होतं. असा सोहळा एकत्र बसून, चर्चा करून आणि नियोजन करून केला असता तर अधिक चांगला झाला असतं, असं शरद पवार म्हणाले.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं आहे. साधू संतांच्या हस्ते आणि मंत्रोच्चारात संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी सर्व धर्मीयांची प्रार्थना सभाही झाली. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आक्षेप घेतला आहे. संसदेत धर्मकांड सुरू होतं. त्यामुळे आधुनिक भारताची नेहरूंची संकल्पना मागे पडली की काय? याची चिंता वाटत आहे. आपला देश अनेक वर्ष पाठी जात असल्याची चिंताही वाटत आहे, असं शरद पवार म्हणाले. शरद पवार हे पत्रकार परिषदेत बोलत होते.
ज्या लोकांची तिथं उपस्थित होती, जे काही धर्मकांड काम सुरू होती, ते पाहिल्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताची जी संकल्पना मांडली होती, ते पाहता जे आता पार्लमेंटमध्ये चाललंय यात जमीन अस्मानाचं अंतर आहे. पुन्हा एकदा आपण देशाला काही वर्ष पाठी नेतो की काय अशी चिंता वाटू लागली आहे. विज्ञानाशी तडजोड करता येत नाही. नेहरूंनी आधुनिक विज्ञानावर आधारीत समाज तयार करण्याची भूमिका सतत मांडली. आज त्या ठिकाणी जे चाललं ते नेमकं उलटं चाललं आहे, असा आक्षेप शरद पवार यांनी नोंदवला.
उपराष्ट्रपती दिसले नाही
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना निमंत्रण देण्याची सत्ताधाऱ्यांची जबाबदारी होती. कारण संसदेच्या कोणत्याही कामाची सुरुवात ही राष्ट्रपतींच्या उपस्थित होते. त्यांच्या भाषणाने होते. अधिवेशनाची सुरुवातही राष्ट्रपतींच्या भाषणाने होते. राज्यसभेचे प्रमुख हे उपराष्ट्रपती आहेत. संसदेचा कार्यक्रम म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा. त्यामध्ये लोकसभेचे अध्यक्ष दिसले. आनंद आहे. पण राज्यसभेचे प्रमुख हे उपराष्ट्रपती आहेत. त्यांची उपस्थिती यत्किंचित दिसली नाही. त्यामुळे हा सोहळा मर्यादित घटकांसाठीच होता की काय अशी शंका आहे, अशी टीका पवार यांनी केली.
जुन्या संसदेशी आस्था
जी जुनी संसद आहे. त्याबद्दल आमची आस्था आहे. आमची बांधिलकी आहे. या देशात दिल्लीत कोणीही आले तर नव्या माणसाला संसद, राष्ट्रपती भवन आणि इंडिया गट दाखवले जातात. संसदेचं एक्झिबिशन आहे. त्याला लोक भेटतात. त्यातून देशाचा इतिहास मांडला जातो. त्याचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न आहे का अशी शंका आहे, असं ते म्हणाले.
विचारात घेतलं नाही
ठिक आहे. निर्णय घेतला. राबवला. त्याची चर्चाही झाली नाही. असा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे की नाही हे संसदेत मांडलं नाही. प्लान केला त्याची चर्चा मर्यादित लोकांशी केली असावी. पण आम्हाला सांगितलं नाही. इतकी मोठी गोष्ट करताना त्यांनी सर्वांना विचारात घ्यायला हवं होतं, असंही ते म्हणाले.
मला निमंत्रण नाही
विरोधी पक्षातील सभासदांना निमंत्रण दिलं की नाही माहीत नाही. माझ्या हातात निमंत्रण आले नाही. पण माझ्या दिल्लीच्या घरी पाठवलं असेल तर माहीत नाही. पण माझ्या हातात आलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.