17 तास नॉट रिचेबल का होते? अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मला कसंतरी…
मी कुठेही गेलो नव्हतो. माझी तब्येत बरी नव्हती. त्यामुळे मी घरीच होतो. पण माझ्याबद्दल उगाच अफवा उडवण्यात आल्या, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
पुणे : तब्बल 17 तास नॉट रिचेबल झाल्यानंतर अखेर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार प्रकटले आहे. एका ज्वेलरीच्या शोरूमच्या उद्घाटनाला अजित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधला आणि अफवा पसरवणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. मी कुठेही गेलो नव्हतो. मी इथेच होतो. तब्येत बरी नव्हती म्हणून औषधं घेऊन झोपलो होतो. पण मी कुठे आहे याची खात्री न करता अनेकांनी बातम्या चालवल्या. ते चुकीचं आहे, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी आपली तब्येत बरी नसल्यानेच आपण नॉट रिचेबल असल्याचं सांगून चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
कार्यक्रमाला निघालो असताना पित्ताचा त्रास व्हायला लागला. जागरणं जास्त झाली आणि दौरे जास्त झाले तर मला पित्ताचा त्रास होतो. हे आज नाही पहिल्यापासून आहे. मला कसं तरी व्हायला लागल्यानंतर मी जिजाईला जाऊन डॉक्टरांकडून गोळ्या घेतल्या आणि शांतपणे झोपी गेलो. मला इतकं वाईट वाटत होतं मीडिया काहीपण दाखवत होता. अजित पवार नॉट रिचेबल… हे बंद करा ना. तुम्ही आधी कन्फर्म करा. ते कुठे आहेत? काय आहेत ते पाहा. कारण नसताना एखाद्याची बदनामी नसताना किती बदनामी करायची? असा सवाल अजित पवार यांनी केला.
आम्हीही माणूस आहोत
ठिक आहे तुम्हाला अधिकार आहे. आम्ही पब्लिक फिगर असल्याने तुम्हाला तशा प्रकारच्या बातम्या देण्याच्या. शेवटी आम्ही माणूस आहे. आज पेपर पाहिला तर ब्रॅकेट टाकून बातम्या आल्या. हे बरोबर नाही. खात्री करून बातम्या चालवल्या असत्या तर बरं झालं असतं, असा टोला अजित पवार यांनी लगावला.
तीच आमची भूमिका
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अदानी प्रकरणात जेपीसी समिती नेमण्याची गरज नसल्याचं म्हटलं होतं. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी पवार साहेबांची बातमी पाहिली, पवार साहेब हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांनी भूमिका मांडल्यानंतर त्यावर आम्ही बोलू शकत नाही. कारण तीच आमची भूमिका आहे. पक्षाची भूमिका आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
कशाला प्रश्न निर्माण करता
सावरकरांच्या मुद्दयावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.आपल्या देशात अनेक महापुरुष होऊन गेले. अनेक महापुरुषांना शंभर वर्ष होऊन गेली आहेत. त्या महापुरुषांचा उल्लेख केला तर त्यांच्याबद्दल आदरच दाखवला पाहिजे. ती आपली संस्कृती आहे. परंपरा आहे. त्यातून कारण नसताना नवीन प्रश्न निर्माण करण्याची गरज नाही. महापुरुष म्हणून त्यांनी केलेलं काम गौरवास्पद आहे. त्यातून नवे प्रश्न निर्माण करण्याची गरज नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.