पुणे लोकसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार का?, भाजपच्या प्रयत्नांना पहिला सुरूंग?; अजितदादा काय म्हणाले?
आपल्या श्रद्धास्थानावर जाऊन दर्शन घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जात असतील तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.
पुणे : भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीतून काँग्रेसने या जागेवर दावा केला आहे. काँग्रेसकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर भाजपमधून तीन नावांवर चर्चा सुरू आहे. मात्र ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही? अशी चर्चा सध्या रंगली आहे. कारण ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. त्यावर अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार यांच्या या विधानामुळे भाजपच्या प्रयत्नांना सुरुंग लागण्याची शक्यता वर्तण्यात येत आहे.
अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मोठं विधान केलं.माझ्या माहिती प्रमाणे लोकसभा निवडणुकीला एक वर्ष आणि काही महिने राहिले आहेत. रेकॉर्ड पाहिलं तर कमी वेळ शिल्लक असतानाही निवडणुका झाल्या आहेत. पण पुण्याबाबत निवडणूक आयोगच निर्णय घेईल. निवडणूक आयोगाने निर्णय घेतला तर सर्व राजकीय पक्ष एकत्र येतील आणि तेही निर्णय घेतील. मागील निवडणुकीत महाविकास आघाडीने निर्णय घेतला होता. तसाच यावेळीही घेतला जाईल, असं अजित पवार म्हणाले. निवडणूक आयोगाने अजून पोटनिवडणुकीची घोषणा केली नाही. त्यामुळे त्यावर चर्चा करणं योग्य नाही. रितसर घोषणा झाल्यावर सर्व राजकीय पक्ष ठरवतील. बिनविरोध निवडणूक होणार अशी चर्चा झालीच नाही, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
त्यांनाच विचारा
भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांनी माफी मागितल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यावरही अजित पवार यांनी मत व्यक्त केलं. चंद्रकांत पाटील यांनी साद घातली. त्यांना मत मांडण्याचा अधिकार आहे. पण मी त्यावर बोलू शकत नाही. त्यांचं मत असू शकतं. त्यावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच बोलतील. त्यांनाच विचारा, असं ते म्हणाले.
आता बसले… आता निघाले…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रत्येकाला आपण वेगवेगळया जातीचे लोक आहोत. आपला देश सेक्युलर विचाराचा आहे. अनेक लोकं इथे राहतात. त्यांना वाटतं दर्शनाला जावं. ते गेले आहेत. मीही दर्शनाला गेलो तर पब्लिसिटी करत नाही. पण ते अयोध्येला जात असतील तर त्याला आमच्या शुभेच्छा आहेत, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिंदे यांच्या दौऱ्याची कॉमेंट्रीही केली. आता निघाले… आता बसले… आता विमान निघालं… टेक ऑफ झालं… आता विमान लँड झालं.. (हसत ) असं दाखवणं बरोबर नाही, असा चिमटा त्यांनी काढला.
दर्शन घेण्याचा अधिकार
महागाई, कायदा सुव्यवस्था, कोरोनाची संख्या वाढत आहे. या समस्या आहेत. त्याला आग्रक्रम दिला तर ते संयुक्त ठरेल. पण त्यांना योग्य वाटलं ते अयोध्येला जात आहेत. प्रत्येकाला श्रद्धास्थानाला जाऊन दर्शन घेण्याचा अधिकार आहे. आमचा रोहितही गेला होता. त्याच्या थोड्या बातम्या आल्या. अनेक लोक साईबाबा, तिरुपती, तुळजाभवानीला जातात. जिथे जायचं तिथे दर्शन घ्यायला जातात. राज्याचे प्रमुख म्हणून जात असताना त्यांना प्रसिद्धी मिळणं स्वाभाविक आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असंही ते म्हणाले.