तुमच्या हातात सत्ता आहे ना? द्रोह वाटतो तर केसेस दाखल करा; अजित पवार यांचं देवेंद्र फडणवीस यांना ओपन चॅलेंज
मी माफी मागावी असं सांगितलं जात आहे. मी असा काय गुन्हा केला? अपशब्दही वापरला नाही. राज्यपाल, मंत्री आणि सत्ताधारी आमदारांनी बेताल वक्तव्य केले. अपशब्द वापरले.
पुणे: छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षकच म्हणा. ते धर्मवीर नव्हते, असं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं होतं. अजित पवार यांचं हे विधान द्रोहच असल्याचं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यावर अजित पवार यांनी थेट फडणवीस यांना खुलं आव्हानच दिलं आहे. माझं विधान जर तुम्हाला द्रोह वाटतं तर केसेस दाखल करा ना. तुमच्या हातात सत्ता आहे. करा केसेस दाखल, असं ओपन चॅलेंजच अजित पवार यांनी दिलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
अजितदादांचं विधान हे द्रोहच आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? असा सवाल अजित पवार यांना करण्यात आला. त्यावर, माझं विधान द्रोह आहे की नाही याबाबत त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या हातात सत्ता आहे ना. तुम्हाला जर द्रोह वाटतो तर केसेस दाखल करा, असं आव्हान देतानाच पण ही केस नियमात बसते का? असा चिमटा अजित पवार यांनी फडणवीसांना काढला.
जीवात जीव असेपर्यंत छत्रपतींच्या विचारांशी आम्ही द्रोह करणार नाही. आमच्याकडून तसं घडणार नाही. आमच्या दहा पिढ्याही तसं करणार नाही, असंही त्यांनी यावेळी निक्षून सांगितलं.
भाजप हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे मांडत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीनेही आक्रमक होण्याचा निर्णय घेतला काय? असा सवाल केला असता अजितदादांनी थेट पक्षाचीच भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादीची स्थापनाच मुळी स्वाभिमानातून झाली आहे. पहिल्यापासून आम्ही पुरोगामी विचार मानणारेच आहोत.
आम्ही काँग्रेसमध्ये होतो तेव्हा काँग्रेसचा विचारही सर्वधर्मसमभावाचा होता. दोन्ही पक्ष वेगळे झाले तरी पुरोगमीत्वाची कास घेऊन त्याच दिशेने आम्ही काम करत आहोत. महापुरुष आणि वडीलधाऱ्यांनी जी शिस्त घालून दिली. विचाराचा पगडा आहे त्याला धक्का न लागता पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न असतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मी माझ्या भूमिकेशी ठाम असतो. तुम्ही जेव्हा भारतीय नागरीक असता तेव्हा कायद्याचं पालन केलं पाहिजे. हे करताना प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. विचार स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी जी काही भूमिका मांडली पाहिजे ती सर्वांना पटावी असं माझं म्हणणं नाही. तसेच माझी भूमिका चुकीची आहे हे तुम्ही ठरवणारे कोण?, असा सवाल त्यांनी केला.
मी माफी मागावी असं सांगितलं जात आहे. मी असा काय गुन्हा केला? अपशब्दही वापरला नाही. राज्यपाल, मंत्री आणि सत्ताधारी आमदारांनी बेताल वक्तव्य केले. अपशब्द वापरले. जे शब्द वापरायला नको होते ते शब्द सत्ताधाऱ्यांनी वापरले.
त्यावर सत्ताधारी वर्ग बोलायला तयार नाही. कारण नसताना काही राजकीय पक्ष वातावरण गढूळ करत आहेत. तुम्ही तुमची भूमिका मांडा. आम्ही आमची भूमिका मांडू. जनतेला जी भूमिका पटेल ती ते स्वीकारतील, असंही ते म्हणाले.