अजितदादांना हृदय नाही, पुतण्याचा काकावर जिव्हारी लागणारा हल्ला
लोकसभा निवडणुकीमधील बारामती मतदारसंघातील प्रचारतोफा आज थंडावल्या. काका-पुतण्यांची सभा पार पडली, यावेळी रोहित पवार यांनी अजित दादांवर टीका करताना त्यांना हृदय नसल्याचं म्हटलंय.
लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदार संघातील लढतीकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलेलं असणार आहे. बारामतीमध्ये आज (रविवार) प्रचाराचा शेवटचा दिवस होता. काका-पुतण्याच्या प्रचारतोफा थंडावल्यात. बारामतीकर कोणाच्या पारड्यात कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बारामतीमध्ये शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. अजित पवारांना हृदय नसल्याचं म्हणत रोहित पवारांनी अजित दादांवर खोचक टीका केलीय.
रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
दादांना हदय नाही त्याला आम्ही काय करणार? लहानपणापासून त्यांना सांभाळालं आणि पवारांना सोडून गेले. अजित पवारांच्या सभेत 500 रूपये देवून लोकांना आणलं होतं. मतदानासाठी 3500 रूपये गरिबांना वाटले जातात. तर श्रीमंताना 5 हजार रूपये वाटले जातात म्हणजे पैसे वाटपातही ते हे करत आहेत. साडी देण्यात आली ती चांगली गोष्ट आहे. पण मविआच्या उमेदवार सुप्रिया सुळे तीन ते साडे तीन लाखांच्या लीडने निवडणुक जिंकतील, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
रोहित पवार आपल्या भाषणात शरद पवारांविषयी बोलताना भावनिक झाले होते. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. कारण भर सभेमध्ये रोहित पवार रडले, राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा झाली. त्यासोबतच रोहित पवारांचे या भाषणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र रोहित पवारांची नक्कल आपल्या भाषणात अजित पवारांनी केली.
अजित पवार काय म्हणाले?
कोणीतरी पठ्ठ्या डोळ्यातून पाणी काढलं, मी सुद्धा काढतो पाणी. रडीचा डाव खेळू नका. मी यांना जिल्हा परिषदेचं तिकीट दिलं आणि तेव्हा शरद पवार नको बोलत होते. तुम्ही आम्हाला राजकारण शिकवत आहात? तुमच्यापेक्षा जास्त उन्हाळे आणि पावसाळे पाहिले आहेत, असं अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले. यावेळी अजित पवारांनी रोहित पवारांची नक्कल केल्याचं पाहायला मिळालं.