रणजित जाधव, Tv9 मराठी, पुणे | 7 ऑक्टोबर 2023 : केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? या मुद्द्यावरुन नुकतीच सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या वकिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. शरद पवार हे पक्षात मनमानीपणे वागत होते. पक्षात पक्षांतर्गत निवडणुका झाल्या नाहीत, असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला. या सुनावणीवर शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपले काका अजित पवार आणि त्यांच्या गटावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांनाही टोला लगावला.
“ट्रोल करणं हे त्यांचं काम आहे. आज हे लोक वडिलांनाच घरातून बाहेर काढू लागले आहेत. शरद पवारांनी आजवर अनेकांना मंत्रीपद दिली, अधिकारही दिले. त्यांच्या अधिकारात हस्तक्षेप केला नाही. पण आज ते विरोधी गटात स्वार्थासाठी गेले अन् तिथं जाऊन म्हणतात पवार साहेब आमचं चालू देत नव्हते. शरद पवार हे हुकूमशाही पद्धतीने काम करतात असं म्हणतात, हे अशोभनीय आहे”, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक अजित पवार यांना पाठिंबा देणार का? असा प्रश्न रोहित पवारांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर त्यांनी फार भाष्य करणं टाळलं. “आज कोण कुठं आहे, यापेक्षा लढा कसा उभारायला हवं याकडे आमचं लक्ष. आलेल्या बातम्यांवर भाष्य करणं योग्य नाही”, असं रोहित पवार म्हणाले.
“अजित दादांच्या सभेत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे फोटो दिसतायेत. त्याच चव्हाण साहेबांना पवारांनी गुरू मानलं. त्यांच्या प्रेरणेने शरद पवार राजकारण करतात. आता शरद पवारांचा फोटो वापरता येईना म्हणून यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वापरत आहेत. आता चुकीच्या पद्धतीने काम केलं तर कराडच्या समाधीस्थळी जाऊन आत्मक्लेश करण्याची गरज नाही. यशवंतराव चव्हाण यांच्या फोटो समोर बसून केलं तरी चालेल”, अशी खोचक टीका रोहित पवारांनी केली.
“मंत्री छगन भुजबळ आज काहीही बोलतील. पण त्यांनी हे विसरू नये त्यांनाच शरद पवारांनी अनेक मंत्रीपदं दिलेली आहेत”, अशा कानपिचक्याही रोहित पवारांनी यावेळी दिल्या. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना पुन्हा कधीतरी मुख्यमंत्री करू असंच म्हणणार. आत्ताच मुख्यमंत्री करू, आत्ताच न्याय मिळवून देऊ, आत्ताच मृत रुग्णांना मदत करू, असं ते म्हणणार नाहीत. नेहमीच पुन्हा करू असं त्यांचं म्हणणं असतं”, असा टोला रोहित पवारांनी लगावला.
“अख्खा महाराष्ट्र भिकारी होईल पण आरोग्य मंत्री तानाजी सावंत कधीच भिकारी होणार नाहीत. अगदी असंच सध्या सुरुय. म्हणून तर स्वतःचा विचार करतायेत, रुग्ण मृतांबाबत मला काहीच विचारू नका असं आरोग्य मंत्री म्हणत आहेत”, अशी टीका रोहित पवारांनी केली.