‘नरेंद्र मोदी माझे आवडते पंतप्रधान’, सुप्रिया सुळे यांच्याकडून केंद्र सरकारचं कौतुक
हल्ली विरोधकांनी सरकारचं कौतुक करणं ही खरंतर दुर्मिळ बाब मानली जाते. पण खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या कामांचं कौतुक केलं.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पिंपरी येथील मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या अधिवेशनात केंद्र सरकारचं कौतुक केलं. हल्ली विरोधकांनी सरकारचं कौतुक करणं ही खरंतर दुर्मिळ बाब मानली जाते. पण खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या कामांचं कौतुक केलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे आवडते पंतप्रधान, असादेखील उल्लेख सुप्रिया सुळे यांनी केला. विशेष म्हणजे राजकारणात आपल्याला मराठी संस्कृती देखील जपायची असल्याचं विधान देखील त्यांनी केलं. पण यावेळी सुप्रिया सुळे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरुन चांगलीच तिखट प्रतिक्रियादेखील दिली.
“केंद्र सरकारच्या विरोधात मी लिहीत नाही. ते काही चांगल्या गोष्टी देखील करत आहेत. नरेंद्र मोदी माझे आवडते पंतप्रधान आहेत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचंदेखील कौतुक केलं. “भारत जोडो यात्रा मला आवडते. आम्ही एका विचारांचे आहोत. काँग्रेस नेते राहुल गांधी चांगला प्रयोग करत आहेत. भारत जोडो एक वेगळा प्रयत्न आहे”, असं सुप्रिया म्हमाल्या.
“भारत जोडो यात्रा ही फक्त राहुल गांधीची यात्रा नाही तर सर्व भारतीयांची आहे”, असंदेखील त्या यावेळी म्हणाल्या.
राज्यपालांच्या विधानावर सुप्रिया सुळे आक्रमक
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरही सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका मांडली.
“आमच्या छत्रपतींच्या विरोधात बोलणार असाल तर आम्ही खपवून घेणार नाही. चूक एकदा होऊ शकते. मात्र वारंवार करणे म्हंजे ती त्यांची चॉईस”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“हर हर महादेव चित्रपटामध्ये चुकीच्या गोष्टी दाखवल्या गेल्या. भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी जे बोलले असा इतिहास कोणी वाचला का? यांना कोणी इतिहास कसा सांगत नाही”, अशा शब्दांत सुप्रिया यांनी संताप व्यक्त केला.
“जर हे छत्रपती यांच्या विरोधात बोलले तर हे काहीही करू शकतात? छत्रपतींच्या विरोधात कोणीही बोलला तर आम्ही खपवून घेणार नाही. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणार”, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.
“उत्तर प्रदेशच्या जाहिराती महारष्ट्रामध्ये का देता? लढेंगे और जितेंगे. आम्ही कायमच सत्तेत राहायला काय मक्तेदारी घेतलीय? खोक्यांबद्दल मी बोलत नाही. नाहीतर पुन्हा काहीतरी व्हायचं. खोक्यांचं राजकारण मी करत नाही”, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.
“पत्रकारांकडून चुकीची बातमी आली तर आम्हाला वेदना होतात. आमच्या कुटुंबावर खूप टीका झाल्यात, त्या कोणत्याच कुटुंबात झाल्या नाही? पत्रकार सरकार पाडू शकतात त्यांना लायटली घेवू नका. बाळासाहेबांनी सर्वात जास्त टीका माझ्या वडिलांवर केली. पण तेवढे संबंधही त्यांनी जोपासले”, असंदेखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“आम्ही मराठी संस्कृतीचं राजकारण करणार. आम्ही छत्रपातींचे मावळे, दिल्लीत झूकणार नाही आणि दिल्लीला केव्हाच घाबरणार नाही”, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.