स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेतल्या जात नाही?, शरद पवार यांचा मोठा दावा काय?; भाजपच्या अडचणी वाढणार?
राष्ट्रवादीचा अध्यक्ष मी आहे. राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील आहे. त्यामुळे पक्षाचं अधिकृत धोरण मांडण्याचा अधिकार आम्हाला आहे. पण कोणी आमच्या नावाने काही करत असेल तर लोकांनी त्यांना स्वीकारण्याचं कारण नाही.
कोल्हापूर | 26 ऑगस्ट 2023 : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे विरोधकांनी चिंता व्यक्त केली आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पेडिंग आहेत. लोकांच्या प्रश्नांशी निगडीत या संस्था आहेत. त्यांना भीती वाटते म्हणून निवडणूक घेत नाहीत. आणखी काही दुसरं कारण नाही. लोक या निवडणुकीत त्यांना जागा दाखवतील, याची त्यांना भीती आहे. लोकांनी जागा दाखवली तर त्याचा परिणाम इतर निवडणुकांवर होईल. त्यामुळे ते निवडणूक घेत नाहीत, असा दावा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे.
शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवरही भाष्य केलं. महाराष्ट्रात मला चेंज दिसतो. दोन गोष्टीबाबत लोकांच्या मनात नाराजी आहे. एक भाजप आणि दुसरे म्हणजे भाजपला पाठिंबा देणारे. ज्यांनी भाजपला पाठिंबा दिला त्या घटकांबाबत नाराजी आहे. तरुण पिढी आणि ज्येष्ठांमध्ये ही नाराजी प्रकर्षाने दिसून येत आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं.
1 तारखेनंतर जागा वाटपावर चर्चा
जागा वाटपाबाबत आम्ही चर्चा करणार आहोत. जिथे त्यांची शक्ती नसेल तिथे आग्रह धरू नये असं मत मांडलं गेलं. तिथे अंतिम निर्णय होईल. तो निर्णय झाल्यावर जागा वाटपाची बैठक होईल. ती बैठक 1 तारखेनंतर होईल. मग कोल्हापूरची जागा असो की चंद्रपूरची सर्वांवर निर्णय घेतला जाईल, असं शरद पवार म्हणाले.
मायावतींना जबरदस्ती करू शकत नाही
बसपा नेत्या मायावती इंडिया आघाडीत का नाही? याबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रत्येक पक्षाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे. मायावती स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. इतरांसोबत निवडणूक लढण्याची त्यांची मनस्थिती नाही. इतरांसोबत निवडणूक लढण्याची मनस्थिती नसेल तर आम्ही त्यांना काही जबरदस्ती करू शकत नाही. त्यांनी जर न येण्याची भूमिकाच स्वीकारली असेल तर प्रश्न येतो कुठे? असा सवाल त्यांनी केला. आम्ही राष्ट्रीय पातळीवर पाहतो. आंध्र आणि तेलंगनासोबत येत नाही. त्यांची भूमिका वेगळी आहे. ते येत नसतील तर त्यांना काही करू शकत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
फायदा होणार
राहुल गांधी पुन्हा भारत जोडो यात्रा काढणार आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. राहुल गांधींचा जो पहिला दौरा झाला. त्यामुळे विरोधकांची स्थिती सुधारली. दुसऱ्या दौऱ्यातूनही स्थिती सुधारेल असं वाटतं. लोकांना संघटीत करण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा आहे. त्यांचा दौरा हा विरोधकांसाठी चांगला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.