पिंपरी- चिंचवडचा पाणीप्रश्न : राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन ठरले ‘फुसका बार’; मोजक्याच पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

| Updated on: Dec 15, 2021 | 5:18 PM

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठ्याच्या मुद्द्यावरून शहरांमध्ये वातावरण निर्मिती करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा मानस आहे. त्यादृष्टीने त्यांनी बुधवारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारती समोर आंदोलन केले. मात्र, आंदोलनाला पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे आंदोलनाचा अक्षरशः फज्जा उडाला.

पिंपरी- चिंचवडचा पाणीप्रश्न : राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन ठरले फुसका बार; मोजक्याच पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
ncp
Follow us on

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पुरेसा आणि दररोज पाणी पुरवठा होत नसल्याच्या कारणावरून राष्ट्रवादीच्या वतीने बुधवारी आंदोलन करण्यात आले. मात्र, हे आंदोलन अक्षरश: फुसका बार ठरले आहे. आंदोलनाला मोजक्याच पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाला इच्छुक, आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते असे सुमारे 700 ते 800आंदोलक उपस्थित राहतील असे अपेक्षित असताना केवळ 60 ते 70 लोकांमध्ये आंदोलन उरकण्यात आले.

दिवसा आड पाणीपुरवठ्यातून सुटका होईल

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत नोव्हेंबर 2019 पासून पहिल्यांदा दोन महिन्यांसाठी एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. त्यांनतर तो कायम ठेवण्यात आला आहे. पुढील वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा धरणात आहे. पाण्याची चिंता संपली. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठ्यातून सुटका होईल. दररोज पाणी मिळेल अशी शहरवासीयांना अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली. एका दिवसाआड सुरु असलेला पाणीपुरवठा कायम ठेवला. त्यानंतर प्रशासनाने नोव्हेंबर अखेरपासून टप्या-टप्प्याने दररोज पाणीपुरवठा केला जाईल अशी ग्वाही दिली. परंतु, ती डेडलाईनही प्रशासन पाळू शकले नाही. त्यामुळे सत्ताधारी भाजप शहरावसीयांना दररोज पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा आणि प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले.

आंदोलनाचा अक्षरशः फज्जा उडाला
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठ्याच्या मुद्द्यावरून शहरांमध्ये वातावरण निर्मिती करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा मानस आहे. त्यादृष्टीने त्यांनी बुधवारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारती समोर आंदोलन केले. मात्र, आंदोलनाला पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे आंदोलनाचा अक्षरशः फज्जा उडाला. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाला इच्छुक, आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहतील असे अपेक्षित असताना नेहमीच्याच पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केले. शहरांमध्ये सध्या 32 प्रभाग आहेत. या 32 प्रभागामधून राष्ट्रवादीच्या माध्यमातून निवडून आलेले नगरसेवक तसेच आगामी निवडणुकांसाठी इच्छुक असलेले उमेदवार, कार्यकर्ते, पदाधिकारी अशी जमा बेरीज धरली तरी देखील सातशे-आठशे लोक सहज जमू शकले असते. मात्र, बोटावर मोजण्याइतके पदाधिकारी, कार्यकर्ते हेच नेहमीचे चेहरे आज आंदोलना दरम्यान दिसले. त्यामुळे राष्ट्रवादीचे आंदोलन फसले, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे.

….या कारणामुळे आंदोलन फसले?

  • दहा ते बारा वर्षांपूर्वी शहराला पाणीपुरवठा करणारी पवना बंद जलवाहिनी योजना आपल्या सत्ता काळात प्रत्यक्षात उतरवण्यात राष्ट्रवादीला जमले नाही.
  • योग्य पाठपुरावा न केल्यामुळे पवना जलवाहिनी योजना थंडबस्त्यात जमा झाली. पाण्याचे आरक्षण देखील राष्ट्रवादीच्या सत्ता काळामध्ये रद्द झाले.
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात तब्बल पंधरा वर्षांच्या सत्ताकाळात पाणीपुरवठया संदर्भात नवीन ठोस उपाय योजना करण्यात न आल्यामुळे नागरिकांनी देखील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण निर्मिती करण्याचा हा कावा ओळखला. त्यामुळेच या आंदोलनाकडे पाठ फिरवीत नागरिकांनीदेखील राष्ट्रवादीला एक प्रकारे चपराक दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक अजित गव्हाणे, नाना काटे, मयूर कलाटे, राजू बनसोडे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका अपर्णा डोके, संगिता ताम्हाणे, शमीम पठाण, फजल शेख, वर्षा जगताप आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.

OBC Reservation : निवडणुकीच्या तारखा घोषित, आता सर्व अधिकार निवडणूक आयोगाकडे, घटनातज्ज्ञांचं मत

Aurangabad: जिल्ह्यातल्या निवडणुकीत यंदा 53 हजार नवे मतदार, 21 हजारांची नावं वगळणार, 5 जानेवारीला अंतिम यादी

Obc reservation : अजित पवार, विजय वडेट्टीवारांनी माफी मागून राजीनामा द्यावा-प्रकाश शेंडगे