Baramati Ajit Pawar : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबद्दल आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करणार; बारामतीत अजित पवारांची माहिती
पुण्यात ओमायक्रॉनचे 2 नवे सब व्हेरिएंट BA4चे चार आणि BA5चे तीन रुग्ण आढळले आहेत. त्यात 4 पुरूष आणि 3 महिलांचा समावेश आहे. त्यातील चार रुग्ण हे 50पेक्षा जास्त वय असलेले, 2 रुग्ण 20 ते 40 मधील, तर एक रुग्ण हा 10 वर्षाखालील असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

बारामती, पुणे : राज्यात विशेषत: पुण्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळत आहेत. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून जनतेला याविषयी सांगितले जाईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे. ते बारामतीत बोलत होते. विविध विकासकामे तसेच जनता दरबार (Janta Darbar) यानिमित्त ते बारामतीत आहेत. यावेळी त्यांनी कोरोनाच्या व्हेरिएंटविषयी माहिती दिली. याविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट BA4 आणि BA5चे 7 रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य खाते खडबडून जागे झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे नवे व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य (Contagious) असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. याचविषयी अजित पवार यांनी चिंता व्यक्त करत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
काय आहे कोरोनाचा नवा व्हेरिएंट?
पुण्यात ओमायक्रॉनचे 2 नवे सब व्हेरिएंट BA4चे चार आणि BA5चे तीन रुग्ण आढळले आहेत. त्यात 4 पुरूष आणि 3 महिलांचा समावेश आहे. त्यातील चार रुग्ण हे 50पेक्षा जास्त वय असलेले, 2 रुग्ण 20 ते 40 मधील, तर एक रुग्ण हा 10 वर्षाखालील असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. ओमायक्रॉनच्या BA 2 या व्हेरिएंटप्रमाणेच BA4 आणि BA5 व्हेरिएंटची लक्षणे आहे. या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण तामिळनाडू तर दुसरा रुग्ण तेलंगाणात आढळला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रातील पुण्यात 7 रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या व्हेरिएंटपासून सुरक्षित राहण्यासाठी कोरोना लसीच्या बूस्टर डोसची गरज असल्याचे इंडियन सार्स कोव्ह – 2 जिनोमिक्स कंसोर्टियमने म्हटले आहे.



काय म्हणाले अजित पवार?
अधिक संसर्गजन्य मात्र कमी घातक
ओमायक्रॉनचा BA4 आणि BA5 हे सब व्हेरिएंट जगात कोरोनाचा केसेसमध्ये मोठी वाढ होण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. 16 देशांमध्ये BA4चे जवळपास 700 पेक्षा अधिक रुग्ण तर 17 देशात BA5चे 300पेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे. कोरोनाचे विषाणूचा हे नवे व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य असले तरी ते घातक नसल्याचे तज्ज्ञ सांगत आहे. असे असले तरी काळजी घेणे आणि सतर्क राहणे अधिक गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आरोग्य विभागाला या नव्या व्हेरिएंटबद्दल चौकशी करायला सांगितले आहे. मंत्री राजेश टोपे यांच्याशीही उद्या मुंबईत चर्चा करून जनतेला काय काळजी घ्यावी, याविषयी सांगितले जाईल, असे अजित पवार म्हणाले आहेत.