पुणे | 4 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासंदर्भात काही महिन्यांपूर्वी आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यानंतर मोठा वादंग झाला होता. राज्यात सात ठिकाणी ती पोस्ट लिहिणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर त्या युवकाला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर ५० दिवस कारागृहात तो होता. परंतु आता कारगृहातून बाहेर आला आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये त्याला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन् आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील सटाणामधील निखिल भामरे याने शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. त्या पोस्टमध्ये निखिल याने लिहिले होते की, “वेळ आली आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची. #बाराचा_काका_माफी_माग.” गेल्या वर्षी ही पोस्ट निखिल भामरे याने लिहिल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली होती. राज्यभरात सात ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाले होते. त्यानंतर त्याला अटक झाली होती. जवळपास ५० दिवस तो तुरुंगात होता.
निखिल भामरे आता भाजपमध्ये दाखल झाला आहे. त्याला भाजपकडून मीडिया सेलमध्ये घेतले गेले आहे. भाजपने त्याला सोशल मिडिया सेलचे सहसंयोजक केले. त्यानंतर शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे निखिल याला हे बक्षीस मिळाले का? अशी चर्चा राज्यात सुरु झाली आहे. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस या मुद्यावरुन आक्रमक झाली आहे.
सोशल मिडियात मा. पवार साहेबांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या निखिल भामरे याची भाजपकडून सोशल मिडियाचा सहसंयोजक म्हणून नेमणूक केली जाते, म्हणजेच समाजात विकृतीला खतपाणी घालण्याचं काम भाजपच करत असल्याचं स्पष्ट झालंय. समाजात विष कालवणाऱ्या या विकृत कृतीचा तीव्र निषेध!
भाजपच्या आणि… pic.twitter.com/JnoY5HbbEj— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 4, 2023
रोहित पवार यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, ”सोशल मिडियात शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या निखिल भामरे भाजप सोशल मिडियाचा सहसंयोजक झाला आहे. त्याची ही नेमणूक म्हणजेच समाजात विकृतीला खतपाणी घालण्याचा प्रकार आहे. हे काम भाजपच करत आहे. समाजात विष कालवणाऱ्या या विकृत कृतीचा तीव्र निषेध! भाजपच्या आणि त्यांच्या #मित्र_पक्षाच्या किती नेत्यांकडून या कृतीला विरोध होतो, हेच आता बघायचंय.”, हे ट्विट त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी टॅग केले आहे.