पुणे : इंद्रायणी नदीचे (Indrayani river) प्रदूषित पाणी वापरू नये, असे आवाहन आळंदी नगर परिषदेने केले आहे. एक आदेश जारी करून पुढील काही दिवस हे प्रदुषित पाणी न वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उद्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. वारी पंढरीकडे निघणार आहे. राज्यभरातून भाविक, वारकरी (Warkaris) आळंदीत दाखल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी अंकुश जाधव म्हणाले, की राज्यभरातून आळंदीत वारकरी येतात. ते नदीत स्नान करतात. काही जण तर नदीचे पाणी पितात. त्यामुळे त्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ही प्रथा रोखण्यासाठी आम्ही एक विशिष्ट आदेश जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून नदीच्या पाण्यात विषारी फेसाचा (Toxic foam) जाड थर निर्माण झाला आहे. वारकऱ्यांच्या आरोग्याला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.
21 जून रोजी पुण्यापासून सुमारे 25 किमी अंतरावर असलेल्या आळंदीत दरवर्षीप्रमाणे पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे. त्यात सहभागी होण्यास वारकरी येथे दाखल झाले आहेत. नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे जाधव यांनी सांगितले. शनिवारी आम्ही घाट भागातून जलकुंभ साफ केला आहे, जिथे जास्तीत जास्त वारकरी नदीत पवित्र स्नान करतात. त्यामुळे पुढील काही दिवस शहरात राहताना त्यांना अडचणी येणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.
नदीच्या स्वच्छतेसाठी कामगार आणि अर्थमूव्हर्सची एक टीम तयार केली आहे. टीमने नदीतून आधीच जलकुंभ काढला आहे, असे आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय राज्य पाटबंधारे विभागाने शनिवारी देहू येथील धरणातून पाणी सोडले आहे, अशी माहिती देण्यात आली. इंद्रायणी नदीत अनेक भाविक स्नान करत असतात. तर काही भाविक इंद्रायणीचे पाणी तीर्थ म्हणून पितात. मात्र आता इंद्रायणीचे पाणी अस्वच्छ झाले आहे. या पाण्यात स्नान करणे तर लांबच हातपायदेखील धुणे आरोग्यास हानिकारक ठरू शकते. यासर्व आरोग्य समस्या उद्भवण्याच्या आधीच आळंदी नगर परिषदेने वारकऱ्यांना सतर्क केले आहे.