Pune Traffic police : बेदरकार वाहनं चालवणाऱ्यांवर रात्रीही वॉच! पुण्यात वाहतूक पोलिसांच्या आता तीन शिफ्ट, काय म्हणाले अमिताभ गुप्ता?
वाढती वाहने आणि पार्टी संस्कृती यामुळे काही प्रमुख रस्त्यांवर कडक वाहतूक नियंत्रण आवश्यक आहे. रात्रीचे रस्ते अपघात हे मोठे आव्हान आहे. रात्रीच्या वेळी होणारे रस्ते अपघात कमी करण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे, असे अमिताभ गुप्ता म्हणाले.
पुणे : पुण्याच्या वाहतूक शाखेच्या पोलिसांना (Traffic police) आता तीन शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी. यासंबंधीची माहिती दिली आहे. यामुळे वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी, वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी आणि वेगवान वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेचे अधिकारी पहाटे 2 वाजेपर्यंत तीन शिफ्टमध्ये काम करणार आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) याविषयी म्हणाले, की शहरातील रात्रीची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांना तीन शिफ्टमध्ये काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार वाहतूक शाखेकडून नियोजन (Planning) करण्यात आले आहे. रात्रीच्या वाहतुकीचे नियमनही सुरू करण्यात आले आहे. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर जेथे अधिक वाहनांची ये-जा असते, अशा ठिकाणी वाहतूक पोलिसांचा वॉच असणार आहे.
कडक वाहतूक नियंत्रण आवश्यक
रात्रीचे रस्ते अपघात हे मोठे आव्हान आहे. रात्रीच्या वेळी होणारे रस्ते अपघात कमी करण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे, असेही अमिताभ गुप्ता म्हणाले. वाढती वाहने आणि पार्टी संस्कृती यामुळे काही प्रमुख रस्त्यांवर कडक वाहतूक नियंत्रण आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांनी पोलिसांच्या कर्तव्याचे तास वाढवले आहेत. नवीन ड्युटी वेळापत्रकानुसार अधिकाऱ्यांना पहाटे 2 वाजेपर्यंत तीन शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. अपघातांवर काही प्रमाणात का होईना यामुळे नियंत्रण येणार असल्याचे बोलले जात आहे.
गजबजलेल्या भागांत करावे लागणार नियमन
रात्री नऊ वाजेपर्यंत आधी अधिकारी ड्युटीवर असायचे. दरम्यान, सुरुवातीला जंगली महाराज रस्ता, कोरेगाव पार्क, स्वारगेट, बाणेर, कोथरूड, मार्केटयार्ड आणि चतुःश्रृंगी विभाग अशा गजबजलेल्या भागात वाहतूक अधिकाऱ्यांना रात्री काम करावे लागणार आहे. बहुतांश भागात रस्त्यावर कमी वाहने असताना रात्री 10 नंतर मॅन्युअल सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होते. मात्र, कोरेगाव पार्क, विद्यापीठ चौक, स्वारगेट, जंगली महाराज रस्ता आणि इतर काही गजबजलेल्या भागात पहाटे एक वाजेपर्यंत स्वयंचलित सिग्नल सुरू असतात. त्यामुळे वाहतूक नियमन गतिमान करण्यासाठी अधिकाऱ्यांना तीन शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे.