बारामतीत शरद पवार यांना चकवण्यासाठी भाजपचे ओबीसी कार्ड

| Updated on: Dec 22, 2023 | 10:40 AM

Baramati Lok Sabha Election | भाजपने राज्यातील सर्व ४८ जागांवर लक्ष केंद्रीत केले आहे. कोणत्याही परिस्थितीत बारामती जिंकायचे भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी बारामतीची जबाबदारी उच्चविद्याविभूषित आणि अभियंता असणारे नवनाथ पडळकर यांना दिली आहे. त्यांच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांच्या पराभव करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

बारामतीत शरद पवार यांना चकवण्यासाठी भाजपचे ओबीसी कार्ड
chandrashekhar bawankule
Follow us on

प्रदीप कापसे, पुणे, दि.22 डिसेंबर | पाच राज्यातील विधानसभा निवडणुकींचा निकाल तीन डिसेंबर रोजी आला. यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी आपले लक्ष लोकसभा निवडणुकीकडे केंद्रीत केले आहे. इंडिया आघाडीने दिल्लीत जागा वाटपासाठी बैठक घेतली. भाजपकडून मित्रपक्षांसोबत रणनीती तयार केली जात आहे. लोकसभेची प्रत्येक जागा महत्वाची समजून भाजपने मिशन लोकसभा सुरु केले आहे. आता बारामती लोकसभा मतदार संघासाठी भारतीय जनता पक्षाने ओबीसी कार्ड काढले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या विद्यामान खासदार आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी बारामतीची जबाबदारी ओबीसी नेत्याकडे दिली आहे.

का दिली ओबीसी नेत्याकडे जबाबदारी

बारामती लोकसभा मतदार संघात धनगर समाज मोठ्या प्रमाणावर आहे. या मतदारसंघात धनगर समाजाला आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपने ओबीसी कार्डचा वापर केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मोठी खेळी केली आहे. बारामती लोकसभेसाठी नवनाथ पडळकर यांच्याकडे प्रभारी पदाची जबाबदारी दिली आहे. बारामतीत ओबीसी कार्डच्या माध्यमातून विजय मिळवण्यासाठी भाजपचा हा प्रयत्न आहे.

हे सुद्धा वाचा

कोण आहेत नवनाथ पडळकर

कोणत्याही परिस्थितीत बारामती जिंकायचे भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी बारामतीची जबाबदारी उच्चविद्याविभूषित आणि अभियंता असणारे नवनाथ पडळकर यांना दिली आहे. ते भाजपचे प्रदेश सचिव आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते उभे राहिले होते. त्यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवत तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. त्यांनी ओबीसी, वंचित, भटक्या विमुक्त समाजाच्या विविध नेत्यांसोबत भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे त्यांना बारामतीचे प्रभारी करुन भाजपने बारामती लोकसभा जिंकण्यासाठी पाया तयार केला आहे. ओबीसी कार्डच्या माध्यमातून बारामती ताब्यात घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. यापूर्वी 2014 आणि 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांना चांगली लढत दिली होती. सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य कमी झाले होते. आता त्यांना पराभूत करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.