Organ donation : पुण्यात अवयव प्रत्यारोप; ब्रेनडेड महिलेच्या अवयवदानामुळे दोन जवानांसह पाच जणांना जीवदान
पुण्यात (PUNE) एका ब्रेनडेड महिलेच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे पाच जणांचे प्राण वाचले आहेत. ज्यामध्ये दोन लष्करी जवानांचा देखील समावेश आहे.
पुणे : अवयवदान (Organ donation) ही काळाची गरज बनली आहे. आज देशभरात असे लाखो रुग्ण आहेत, ज्यांना विविध कारणांमुळे अवयव (Organ) प्रत्यारोपणाची गरज आहे. मात्र सध्या केवळ दहा टक्क्यांहून कमी रुग्णांना अवयव मिळत आहेत. पुण्यात (PUNE) एका ब्रेनडेड महिलेच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे पाच जणांचे प्राण वाचले आहेत. ज्यामध्ये दोन लष्करी जवानांचा देखील समावेश आहे. ब्रेनडेड महिला ही नुकतेच सेवानिवृत्त झालेल्या सैनिकाची पत्नी होती. गुरुवारी या महिलेला पुण्यातील सदर्न कमांड रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून ब्रेनडेड घोषीत केले. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी या महिलेच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे पाच जणांचे प्राण वाचले आहे. यामध्ये दोन जवानांचा देखील समावेश आहे. गरजू रुग्णांना यशस्वीरित्या अवयवांचे प्रत्यारोप करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
पाच जणांना जीवदान
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी एका सेवानिवृत्त लष्करी जवानाच्या पत्नीला पुण्यातील सदर्न कमांड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तपासून या महिलेला ब्रेनडेड घोषित केले. त्यानंतर या महिलेच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. कमांड हॉस्पिटलमधील डॉक्टर लेफ्टनंट कर्नल भास्कर दत्त, लेफ्टनंट कर्नल सुदीप प्रकाश, शल्यचिकित्सक कर्नल भरत, लेफ्टनंट कर्नल अभिषेक शुक्ला आणि भूलतज्ज्ञ लेफ्टनंट कर्नल अखिल गोयल यांच्या मदतीने ही प्रत्यारोपनाची शस्त्रक्रिया पार पाडली. या महिलेमुळे पाच जणांना जीवदान मिळाले आहे.
Organ donation by a young brain-dead woman saves the life of 5 people including 2 serving Army soldiers in Command Hospital Southern Command (CHSC) in Pune: Defence PRO pic.twitter.com/AbeSgQNdLG
— ANI (@ANI) July 15, 2022
दहा टक्के लोकांनाच मिळतात अवयव
या अवयव प्रत्यारोपनानंतर ब्रिगेडियर गोयल यांनी म्हटलं आहे की, सध्या देशात अवयवदानाची चळवळ अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे. देशात दरवर्षी किमान दोन लाख लोकांना विविध कारणांमुळे अवयव प्रत्यारोपनाची गरज असते. मात्र सध्या स्थितीत यातील केवळ दहा टक्के लोकांचीच गरज पूर्ण होत आहे. त्यामुळे या चळवळीची व्याप्ती वाढवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.