आपला कुठलाही देव बॅचलर नाही, महापुरुषही बॅचलर नाही; चंद्रकांत पाटील यांचं विधान
ते लुटायला आले. इंग्रज आले, डच आले, आपल्याला काय फरक पडला? आपला धर्म बुडाला का? छत्रपती संभाजी महाराज यांचे देखील हाल केले.
पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सध्या काही ना काही विधानांमुळे चर्चेत असतात. आजही ते एका विधानानाने चर्चेत आले आहेत. आज त्यांनी थेट आपला कुठलाही देव आणि महापुरुष बॅचलर नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाची आता चर्चा सुरू झाली आहे. पुण्यात राष्ट्रीय युवा दिवसा निमित्ताने युवा संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.
आपला कुठलाही देव बॅचलर नाही. आपले कुठलेही महापुरुष बॅचलर नाही. संसार करुन सगळं करता येतं. सेवा देखील करता येते. जगात असा कुठलाही माणूस नाही ज्याच रक्त हिरवं किंवा निळं नाही. परमेश्वराने कुठलाच भेद केला नाही. सगळ्यांना कॉमन करुन त्याने पाठवलं. सगळ्यांना दोन डोळे दोन कान आणि समान शरीर देवाने दिले आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
माणसाचा जन्म स्पर्मपासून होतो. स्पर्म दिसत देखील नाही. पण स्पर्म 100 किलोचा माणूस तयार करतो. त्यात माणूस कसा आहे हे ठरवतो. त्या स्पर्ममधून माणूस निर्माण करणारा कोणी तरी आहे ना? सगळी माणसे त्याने वेगळी बनवली आहेत. त्याच्या स्पर्ममध्ये त्याने काय व्हायचंय हे ठरवलेलं असते, असं त्यांनी सांगितलं.
मुलं आता घाबरतात
पूर्वी मुलंमुलीची टिंगल करायचे. आता मुली मुलांची टिंगल करतात. एसपी कॉलेजच्या कट्ट्यावर जायला मुलं आता घाबरतात, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.
स्वामी विवेकानंद यांनी अद्वेत विचार मांडला. जे स्वामीजींचा विचार आत्मसात करतात ते नक्की काहीतरी समजासाठी करतात. हिंदु हा एक विचार आहे. हिंदु हा धर्म नाही. हिंदू राजा कधी कुणाच्या धर्मावर आक्रमण करत नाही. आपला सनातन धर्म पाच हजार वर्षांपूर्वीचा आहे. हिंदू या शब्दातच सर्व धर्म समभाव आहे. हिंदू विचारांमध्ये त्याचा आणि माझा एकच परमेश्वर आहे हा आपला हा विचार मांडला, असंही त्यांनी सांगितलं.
तर सुंता झाली असती
तुम्हाला मंदिरात जायला योग्य वाटतं त्या मंदिरात जा. तुम्हाला मस्जिदमध्ये नमाज पठण करायचं असेल तर ते करा. तुम्हाला आमचा विरोध नाही. हिंदू हा शब्द पूजेशी जोडला गेलेला नाही. हिंदू हा शब्द एक गुण वाचक आहे. आपल्या देशावर किती आक्रमण झाली. अनेक मुस्लिम लोक आले.
ते लुटायला आले. इंग्रज आले, डच आले, आपल्याला काय फरक पडला? आपला धर्म बुडाला का? छत्रपती संभाजी महाराज यांचे देखील हाल केले. पण त्यांनी देखील आपला धर्म सोडला नाही. त्यांच्यावर किती अत्याचार झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपला धर्म वाचवला नाहीं तर सगळ्यांची सुंता झाली असती, असं ते म्हणाले.