झुरळांमध्ये काय ताकद आहे बघा, पनवेल-नांदेड एक्सप्रेस थांबवली, प्रवासी हैराण
पनवेल ते नांदेड ही रेल्वे प्रवाशांनी दीड तास पुणे रेल्वे स्थानकावर रोखून धरली. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. विशेष म्हणजे संबंधित प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
पुणे | 5 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्रात कधी कोणती समस्या उद्भवेल याचा काहीच भरोसा नाही. राज्यात सध्या अनेक घटना घडत आहेत. मग त्या राजकीय घटना असतील, सामाजिक घटना असतील किंवा इतर घटना असतील. सर्वच क्षेत्रात वेगवेगळ्या घटना घडत आहे. काही घटना अतिशय वाईट आणि क्लेशदायक घडत आहेत. तर काही घटनांवर हसावं की संताप व्यक्त करावा? अशी परिस्थिती आहे. राज्यातल्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडी तर वेगळ्याच आहेत. एवढं सगळं सुरु असताना कुठेतरी भ्रष्टाचाराचे देखील प्रकरणं समोर येत आहेत. असं असताना पुण्यातून एक वेगळीच बातमी समोर आली आहे. पुणे रेल्वे स्थानकावर झुरळांमुळे पनवेल-नांदेड एक्सप्रेस थांबवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरंतर तुम्हाला ही बातमी विचित्र वाटत असेल. पण नाही, ही बातमी खरी आहे. झुरळांमुळे पनवेल-नांदेड एक्सप्रेस पुणे रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली.
पनवेल ते नांदेड ही रेल्वे प्रवाशांनी मागील दीड तासांपासून पुणे रेल्वे स्थानकावर झुरळांमुळे रोखून धरली. या रेल्वेत इतकी झुरळं आहेत की पुढे प्रवास करणं प्रवाशांना अशक्य झालं. पनवेल आणि मधल्या स्थानकांवर रेल्वेत बसलेले प्रवासी या झुरळांच्या सुळसुळाटामुळे हैराण झाले. झुरळांचा बंदोबस्त झाल्याशिवाय रेल्वे पुढे न्यायची नाही, अशी भूमिका प्रवाशांनी घेतली आहे. या रेल्वेला पुढे नांदेडला जायचं होतं.
पेस्ट कंट्रोल केल्यानंतरच गाडी सूटली
दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार, असं म्हटलं जात होतं. जवळपास दीड तास ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी रोखून धरली. प्रवाशी आक्रमक झाल्याने अखेर रेल्वे प्रशासनाला मार्ग काढावा लागला. रेल्वे प्रशासनाकडून सफाई कर्मचाऱ्यांना बोलवून पेस्ट कंट्रोल करण्यात आलं. पेस्ट कंट्रोल केल्यानंतरच प्रवाशांनी रोखून धरलेली गाडी सोडण्यात आली.