Pune Metro : पुणेकरांची मेट्रोकडे पाठ; मार्चपासून प्रवासीसंख्येत घट, चार लाखांहून आकडा लाखावर; मेट्रोचे अधिकारी म्हणतात…
मागील 3 महिन्यांपासून जरी प्रवासी संख्या घटली असली, तरी येत्या काही दिवसांत एकूण प्रवासी संख्येचा आकडा 10 लाखांपर्यंत जाईल. तसेच शाळा, कॉलेज चालू झाल्यानंतर या महिन्यात प्रवासी संख्या नक्की वाढेल, असा विश्वास पुणे मेट्रोचे जनसंपर्क संचालक हेमंत सोनावणे यांनी सांगितले आहे.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते 6 मार्च रोजी पुण्यातील मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात मेट्रोमधून प्रवास करण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. इतकेच नाही तर गर्दीचा अंदाज घेऊन मेट्रोने (Pune Metro) शनिवारी आणि रविवारी मेट्रोची सेवा दिली. अनेक वर्षानंतर मेट्रोचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे पुणेकरच नव्हे तर राज्यातील हजारो यात्रींनी आमच्या सफरीचा आनंद लुटला. पण आता याच मेट्रो प्रवासासाठी पुणेकरांनी पाठ फिरवलेली पाहायला मिळत आहे. प्रकल्पाचे मार्चमध्ये स्वागत केल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून मेट्रोच्या प्रवासी संख्येत सातत्याने घट होत आहे. मार्चमध्ये ज्या मेट्रोमध्ये जवळपास चार लाख पुणेकरांनी प्रवास केला होता तीच प्रवासी (Metro passengers) संख्या आता 1 लाखांवर येऊन ठेपली आहे.
मागील 3 महिन्यांपासून पुणे मेट्रोमधील प्रवासी संख्या :
– मार्च : 3,80,023
– एप्रिल : 1,61,822
– मे : 1,30,007
– जून (5 तारखेपर्यंत) : 12,616
‘प्रवासीसंख्या वाढेल’
मागील 3 महिन्यांपासून जरी प्रवासी संख्या घटली असली, तरी येत्या काही दिवसांत एकूण प्रवासी संख्येचा आकडा 10 लाखांपर्यंत जाईल. तसेच शाळा, कॉलेज चालू झाल्यानंतर या महिन्यात प्रवासी संख्या नक्की वाढेल, असा विश्वास पुणे मेट्रोचे जनसंपर्क संचालक हेमंत सोनावणे यांनी सांगितले आहे. प्रवासी संख्या सध्या कमी होण्याचे कारण म्हणजे मुलांच्या शाळा बंद आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर मुलांची, पालकांची गर्दी होण्यास सुरुवात होईल. साधारणपणे दिवसाला दहा हजार आणि शनिवार, रविवार पंधरा ते वीस हजार प्रवासीसंख्येपर्यंत पोहोचू, असा विश्वास सोनावणे यांनी व्यक्त केला.
‘काम प्रगतीपथावर’
प्रवासी संख्या आणि प्रवाशांच्या सूचनेनुसार फेऱ्यांमध्ये बदल केला जाणार आहे. दहा किलोमीटरचा मार्ग सध्या खुला आहे. तर तेरा किलोमीटरचा मार्ग अद्याप खुला व्हायचा आहो. तो अंशत: खुला झाला आहे. त्यामुळे अपेक्षित प्रवासीसंख्या मिळत नाही. काम प्रगतीपथावर असून त्यानंतरच नफा-तोटा हा विचार होईल, असेही ते म्हणाले. तर डिसेंबरअखेर रामवाडीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. त्यानंतर महत्त्वाची ठिकाणे जशी पुणे महापालिका, सिव्हील कोर्ट, आरटीओ, रेल्वे स्टेशन, रुबी हॉल ही स्थानके जोडली जाणार आहेत.