‘MM’ टॅटू काढल्याने दहा वर्षांच्या मैत्रीत फूट, पिंपरीत जिवलग मित्राची हत्या

मयुर मडके या तरुणाने 'एमएम' असा टॅटू काढला. नंतर त्याचा मित्र मंगेश मोरेनेही त्याच आद्याक्षराचा टॅटू काढला आणि वादाची ठिणगी पडली.

MM टॅटू काढल्याने दहा वर्षांच्या मैत्रीत फूट, पिंपरीत जिवलग मित्राची हत्या
| Updated on: Aug 12, 2020 | 5:26 PM

पिंपरी चिंचवड : अंगावर टॅटू काढून घेणं, ही सध्या अनेकांची स्टाईल झाली आहे. पण याच टॅटूमुळे पिंपरी चिंचवडमध्ये दोन जिवलग मित्रांत वाद झाले. या भांडणाची अखेर झाली ती एका मित्राच्या हत्येत. (Pimpari Chinchwad Youth kills Friend over dispute on having same tattoo)

पिंपरी चिंचवडमध्ये 8 ऑगस्टला तरुणाने आपल्याच जिवलग मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिन्याभरापूर्वी मयुर मडके या तरुणाने ‘एमएम’ असा टॅटू काढला. नंतर त्याचा मित्र मंगेश मोरेनेही त्याच आद्याक्षराचा पण थोडे वेगळे डिझाईन असलेला टॅटू काढला आणि वादाची ठिणगी पडली.

हेही वाचा : अल्पवयीन भाचीला अश्लील व्हिडीओ पाहण्याची बळजबरी, पुण्यात मावशीसह प्रियकराला अटक

मयुर मडके आणि मंगेश मोरे हे दहा वर्षांपासून घट्ट मित्र होते. दोघांचे नाव आणि आडनाव ‘एम’ अक्षरावरुन येत असल्याने दोघांनी तसे टॅटू काढले. पण सारखे टॅटू काढण्यावरुन दहा वर्षांच्या मैत्रीत फूट पडली. गेला जवळपास महिनाभर दोघांमध्ये धुसफूस सुरु होती.

टॅटू नंतर काढून घेतलेल्या मंगश मोरेने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मयुर मडकेची हत्या केल्याचा आरोप आहे. पुण्यातील भोसरी पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करुन आरोपी मंगेश मोरेसह सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत. मंगेश मोरेसह सातही आरोपींनी हत्येची कबुली दिली.

हे टॅटू प्रकरण एवढ्यावर थांबलेलं नाही. कारण मयुर मडकेच्या साथीदारांनी सोशल मीडियावर “वेट अ‍ॅण्ड वॉच ओन्ली, रिप्लाय फिक्स” असे धमकीचे मेसेज व्हायरल केले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर आणखी एखादा घातपात होण्याआधीच हे प्रकरण तडीस नेण्याचे आव्हान आहे.