पुणे : आयपीएल (IPL) सामन्यावर सट्टा (Betting) लावल्याप्रकरणी तीन जणांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. तर त्यांच्याकडून काही साहित्यही जप्त करण्यात आले आहे. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स (डीसी) आणि गुजरात टायटन्स (जीटी) यांच्यातल्या आयपीएल सामन्यावर सट्टा लावला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार काळेवाडी परिसरातील एका फ्लॅटध्ये शनिवारी रात्री पिंपरी चिंचवड पोलिसांनी छापा टाकला. याविषयी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, “मी आयपीएल सामन्यासाठी सुरक्षा तैनातीवर देखरेख करत होतो, तेव्हा मला काही लोक सट्टा स्वीकारतात आणि सट्टेबाजीचे रॅकेट चालवतात याबद्दल ठोस माहिती मिळाली. हे लोक काही जणांकडून सट्टा घेत होते आणि सट्टेबाजांपर्यंत पोहोचवत होते, अशी माहिती समोर आली आहे. मी पुढील कारवाईसाठी संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कक्षाला माहिती दिली.
सेलमधील सहाय्यक निरीक्षक हरीश माने म्हणाले, “आम्ही संध्याकाळी 7च्या सुमारास परिसराची पाहणी केली. माहितीची प्राथमिक पडताळणी केल्यानंतर आम्ही काळेवाडी येथील निवासी सोसायटीतील फ्लॅटवर छापा टाकला. आम्ही आठ मोबाइल फोन आणि एक रजिस्टर जप्त केले आहे, ज्यामध्ये पैज लावली जात होती. त्यानंतर अपार्टमेंटची झडती घेतली असता 25 लाखांची रोकड जप्त केली. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे, की तीन संशयित हे लोकांकडून सट्टा घेत होते आणि ते फोनवर आधारित क्रिकेट सट्टेबाजी अॅप्लिकेशनद्वारे बुकीकडे जात होते. त्यांनी सट्टेबाजांना त्यांच्या फोनवर हे अॅप इन्स्टॉल करण्यास सांगितले होते. अंतिम निकाल आणि इतर बाबींवर सामन्यादरम्यान हे बेट घेतले जात असताना, दुसऱ्या दिवशी सकाळी ते निकाली काढायचे होते. आता बुकीचा शोध सुरू केला आहे.”
भूपेंद्र गिल (38) उर्फ सनी, रिकी खेमचंदानी (36), सुभाष अग्रवाल (57) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. सनी सुखेजा या चौथ्या संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले, की छापेमारीच्या वेळी संशयितांनी कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचार्यांना अडथळा आणला, त्यांना मारहाण केली आणि त्यांच्या ‘उच्चस्तरीय संपर्क’चा हवाला देत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
सर्व संशयितांवर भारतीय टेलिग्राफ कायदा आणि महाराष्ट्र महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांवर भारतीय दंड संहिता कलम 353 अंतर्गत सरकारी सेवकाच्या विरोधात फौजदारी बळाचा वापर करण्यासंबंधीदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी गिल हा हिस्ट्रीशीटर असून त्याच्यावर यापूर्वी नऊ गुन्हे दाखल आहेत.