Pune : पाणी उकळूनच प्या, महानगरपालिकेचं पुणेकरांना आवाहन; मुसळधार पावसामुळे धरणं आणि कालव्यांतून वाहतंय गढूळ पाणी
पुणे शहराला प्रामुख्याने खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर धरणातून पाणी मिळत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात 1 जून ते 14 जुलैपर्यंत 43 टक्के जास्त पाऊस झाला आहे.
पुणे : पुणेकरांनी पाणी उकळून प्यावे, असे आवाहन पुणे महानगरपालिकेने (PMC) केले आहे. महापालिका पाण्यावर प्रक्रिया करत असून पाण्याचा दर्जा चांगला आहे. पण खबरदारी म्हणून रहिवाशांनी पिण्याचे पाणी फिल्टर करावे किंवा उकळून घ्यावे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) धरणे आणि कालव्यांमध्ये गढूळ पाणी वाहत आहे. याचा विचार करून नागरिकांनी दक्षता घेण्याचा सल्ला महापालिकेने दिला आहे. महापालिकेच्या जल विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, की गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्यामुळे धरणे आणि कालव्यांमध्ये गढूळ पाणी वाहत आहे. प्रशासनातर्फे या पाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. त्यामुळे पाण्याचा दर्जा चांगला आहे. पण खबरदारी म्हणून रहिवाशांनी पिण्याचे पाणी फिल्टर करावे किंवा उकळूनच (Boil water) प्यावे.
पावसाळ्यात आजाराचा धोका जास्त
पुणे शहराला प्रामुख्याने खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर धरणातून पाणी मिळत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात 1 जून ते 14 जुलैपर्यंत 43 टक्के जास्त पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 313.9 मिमी पावसाच्या तुलनेत 450 मिमी इतका पाऊस झाला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे आवाहन करण्यात आले आहे. इतर ऋतूंच्या तुलनेत पावसाळ्यात आजाराचा धोका जास्त असतो. कारण आर्द्रता, चिखल आणि साचलेले पाणी अनेक विषाणू आणि जीवाणूंच्या प्रजननाचे कारण बनते. त्यामुळे शुद्ध पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कोणत्या आजारांचा धोका?
आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी पाणी उकळून प्यायला हवे. त्यामुळे निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे आणि राहणीमानात सुधारणा करणे हे प्रतिबंधात्मक उपाय असू शकतात. जुलाब, गॅस्ट्रो, विषाणू, उलटी, टायफॉइड, जीवाणूंचे आजार, जंतूची वाढ यांसारखे विविध आजार होण्याची भीती पावसाळ्यातील दुषित पाणी प्यायल्याने असते. दूषित पाण्याद्वारे विषाणूंचा शरीरात प्रवेश होतो. दुषित पाण्यामुळे पोटांचे विकारदेखील बळावतात. अनेकांना याची माहितीदेखील नसते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.