पुणे : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajyasabha Election) निकालाने पुन्हा राज्यातला पॉलिटिकल महौल बदलला आहे. राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (BJP)दणदणीत विजयानंतर सर्वच कार्यकर्त्यांचा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. त्यामुळे ‘ये तो बस्स झॉंकी हैं पुणे महापालिका बाकी हैं!’ (PMC Election)चा नारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. भाजपा कोथरूड मंडलच्या वतीने विजयी जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच एकमेकांना पेढे भरवून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विजयाने कार्यकर्त्याचा उत्साह द्विगुणित झाला आहे. या निवडणुकीत माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार कोल्हापूरचे पैलवान धनंजय महाडिक यांनी जो डाव टाकला, त्यामुळे संजय राऊतांनाही चितपट व्हावे लागले. असा टोला ते संजय राऊतांना लावयला विसरले नाहीत.
तसेच ते पुढे म्हणाले की, “विजयानंतर काल माध्यमांशी बोलताना ‘ये तो बस्स झॉंकी हैं 20 तारीख बाकी हैं,’ म्हटलं होतं. पण आज ‘ये तो बस्स झॉंकी हैं, पुणे महापालिका बाकी हैं!’ हे आपल्याला दाखवायचे आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षच पुन्हा विजयी होऊन पुणेकरांच्या सेवेत रुजू होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, या विजयी जल्लोष कार्यक्रमात आ. पाटील यांनी भाजपचा ध्वज खांद्यावर घेऊन सर्व कार्यकर्त्यांसह गाण्यांच्या तालावर ठेका धरला; आणि त्यांच्या उत्साहात सहभाग घेतला.
विधान परिषदेसाठी भाजपने आत्तापासूनच प्लॅनिंग तयार आहे, राज्यसभेत जसे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणले तसेच विधान परिषदेतही सर्व उमेदवार निवडून आणण्याचे मनसुबे भाजपने आखले आहेत. त्यासाठी राजकीय वातावरणाची चाचपणीही जोरात सुरू आहे. आपले सहाच्या सहा उमेदवार निवडून आले पाहिजेत, हा पक्षाच्या पतिष्ठेचा विषय आहे, त्यामुळे जोमाने कामाला लागा असे आदेश फडणवीसांनी आधीच दिली आहे. त्यामुळे आता भाजपचे हे मनसुबे किती खरे ठरतात हे निवडणुकीनंतर कळेलच.