तुकाराम मुंढेंचे ‘हे’ आठ निर्णय रद्द, मनमानीमुळे पीएमपी तोट्यात
योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढे यांनी घेतलेले निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात पीएमपीच्या अंगाशी येताना दिसतंय. तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी तयार केलेले अनेक निर्णय संचालकांकडून रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे पद भरती आणि शैक्षणिक पात्रतेनुसार कामकाज वर्गीकरणाला खो देण्यात आलाय. याशिवाय बसचा तोटाही मोठ्या प्रमाणात […]
योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढे यांनी घेतलेले निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात पीएमपीच्या अंगाशी येताना दिसतंय. तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी तयार केलेले अनेक निर्णय संचालकांकडून रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे पद भरती आणि शैक्षणिक पात्रतेनुसार कामकाज वर्गीकरणाला खो देण्यात आलाय. याशिवाय बसचा तोटाही मोठ्या प्रमाणात वाढल्याचं काही दिवसांपूर्वीच समोर आलं होतं.
पीएमपीएल महामंडळाचा कारभार सुधारण्यासाठी मुंढे असताना आराखडा तयार केला होता. त्यानुसार विविध नियमात बदल करून आराखड्याची तातडीने अंमलबजावणी सुरू करण्यात आली. त्यामुळे कर्मचारी संघटनांमध्ये नाराजी होती. असं असतानाही आराखड्यानुसार काम करण्यात येत होतं.
संघटनांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. पण काही दिवसांपूर्वीच आराखडा रद्द करण्यात आला. त्यातच इंधन दरवाढ आणि ठेकेदारांचा महामंडळाला दिवसेंदिवस आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यावर महापालिका विरोधी पक्षांनी टीका केली आहे, तर यातील अनेक निर्णय शहराच्या दृष्टीने योग्य नव्हते म्हणून तो रद्द केला असल्याचं पीएमपीकडून सांगण्यात आलंय.
मुंडे यांच्या बदलीनंतर रद्द करण्यात आलेले निर्णय
निलंबित वाहक-चालक कर्मचाऱ्यांना पायघड्या
वाढविलेले पास दर कमी करण्यात आले.
निलंबित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले.
तोट्यातील उत्पन्न असणारे मार्गही सुरू करण्यात आले.
बेशिस्त ठेकेदारावर कारवाईची शिथिलता
ठेकेदारांना ब्रेकडाऊनचा दंड कमी
उत्पन्न घटल्यानंतरही डेपो मॅनेजरवर कारवाई नाही.
ई-बसला मान्यता
बसचा तोटा 14 लाखांनी वाढला
तुकाराम मुंढे यांनी लावलेल्या शिस्तीला तिलांजली देणं पीएमपीला आता महागात पडतंय. पुणे शहराची प्रमुख सार्वजनिक सेवा असलेल्या पीएमपीचा तोटा गेल्या वर्षीच्या तुलनेत दिवसाला 14 लाखांपर्यंत वाढून तो 70 लाखांवर गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एकीकडे तोटा होत असतानाच उत्पन्नही दहा लाखांनी कमी झालंय. तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी लावून दिलेल्या शिस्तीला तिलांजली दिल्यामुळे आज पीएमपी तोट्यात गेल्याचा आरोप केला जात आहे.
तोटा वाढला, उत्पन्नही घटलं
यासंदर्भात पीएमपीला मिळणारे उत्पन्न, खर्च आणि होत असलेला तोटा यासंदर्भात नगरसेवक आबा बागुल यांनी महापालिकेच्या मुख्य सभेच्या प्रश्नोत्तराद्वारे लेखी विचारणा केली होती. त्यावर पीएमपीने दिलेल्या उत्तरातून ही बाब स्पष्ट झाली. सन 2017-18 या वर्षांत दिवसाला 1 कोटी 78 लाख रुपयांचं उत्पन्न पीएमपीच्या तिजोरीत जमा होत होतं. तर दिवसाचा खर्च हा 2 कोटी 34 लाख रुपये होत होता. त्यावेळी तोट्याचे प्रमाण हे 56 लाख रुपये असे होते.
सन 2018-19 या वर्षांतील एप्रिल ते सप्टेंबर या महिन्यात पीएमपीचे दिवसाचं उत्पन्न 1 कोटी 68 लाख रुपये आहे. दिवसाचा खर्च 2 कोटी 38 लाख रुपये आहे. तर दिवसाला होणारा तोटा 70 लाख रुपये आहे. गेल्यावर्षी दिवसाला होणारा तोटा 56 लाख रुपये होता, तो 14 लाखांनी वाढून 70 लाखांवर पोहोचला आहे.