PMPML : पुण्याच्या सिंहगडावरही आता ई-बस! पीएमपीनं उभारलं चार्जिंग स्टेशन, वाहतूककोंडीपासून होणार सुटका
पीएमपीएमएलच्या (PMPML) ताफ्यात सध्या सध्या इलेक्ट्रिक बस (E-Bus) आलेल्या आहेत. या बसेससाठी पीएमपीकडून विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशन (Charging station) उभारण्यात आले आहेत. आता आणखी एक चार्जिंग स्टेशन सिंहगडावर गुरुवारी बसवण्यात आले आहे.
पुणे : पुण्याची सार्वजनिक वाहतूकसेवा पीएमपीएमएलच्या (PMPML) ताफ्यात सध्या सध्या इलेक्ट्रिक बस (E-Bus) आलेल्या आहेत. या बसेससाठी पीएमपीएमएल प्रशासनाकडून विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशन (Charging station) उभारण्यात आले आहेत. आता आणखी एक चार्जिंग स्टेशन सिंहगडावर गुरुवारी बसवण्यात आले असून 200 केव्ही म्हणजेच किलोवॅट ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच खासगी वाहनांना सिंहगडावर बंदी केली जाण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत येथील चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन अपेक्षित आहे. सिंहगडावर खासगी वाहनांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे प्रदूषण व वाहनकोंडीचा सामना सर्वसामान्यांना करावा लागतो. त्यामुळे किल्ल्यावर खासगी वाहनांना बंदी करण्यात यावी, अशी मागणी होत होती. ही मागणी आता पूर्ण करण्यात आली आहे. यामुळे वाहतूककोंडीही कमी होणार आहे.
लहान 9 मीटर लांबीच्या ई-बस
खासगी वाहतूक बंद करून ग्रीन एनर्जीद्वारे पर्यटकांना वाहतूक पुरविण्याचे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रशासनाकडून सिंहगडावर आता पीएमपीच्या लहान 9 मीटर लांबीच्या ई-बसकडून सेवा पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी वनविभाग आणि पीएमपीकडून सिंहगडावर काम सुरू आहे. येथील जागा आता बस पार्किंगसाठी पीएमपीच्या ताब्यात आली आहे. तसेच येथे पीएमपीच्या विद्युत विभागाने 200 केव्हीचा स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर व बसगाड्यांसाठी एक चार्जिंग स्टेशनही उभारले आहे.
पीएमपीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याजवळ वॉकी-टॉकी
सिंहगडावर वनक्षेत्र असल्याने नेटवर्क नसते. त्यामुळे येथे पीएमपी बस सुरू झाल्यावर दैनंदिन नियोजनात अडथळे येण्याची शक्यता आहे. त्यासाठी येथे सेवा पुरविणाऱ्या पीएमपीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याजवळ वॉकी-टॉकी असणार आहे. त्या संदर्भातील आदेश पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत.