Pune Ganeshotsav : वाहतुकीत बदल केल्याचा पीएमपीला फटका, दरदिवशी होतंय 20 ते 22 लाखांचं नुकसान
दगडूशेठ गणपतीसह मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी इतर जिल्ह्यांतूनदेखील नागरिक पुण्यात येतात. त्यांच्यासाठी कॅब किंवा पीएमपी हा पर्याय सहज उपलब्ध होणार असतो. मात्र आता अशा नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
पुणे : गणेशोत्सवामुळे (Pune Ganeshotsav) पुणे पोलिसांनी वाहतुकीत बदल केल्याने पीएमपीएमएलला मोठा फटका बसला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक बंदीमुळे (Main road closed) पीएमपीएमएलच्या 250 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सुमारे सव्वा दोन लाख प्रवाशांना याचा फटका बसला आहे. तर पीएमपीएमएलचे (PMPML) दर दिवशी 20 ते 22 लाखांचे नुकसान यामुळे होणार आहे. पुण्यातील शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता यासह इतर काही महत्त्वांच्या मार्गांवरील या रस्त्यावरील वाहतूक गणेशोत्सवामुळे आहे बंद. त्यामुळे पर्यायाने पीएमपीच्या बसेसही या रस्त्यांवरून धावणार नाहीत. दुसरीकडे पीएमपीएमएल प्रशासनाने सुरू केलेल्या रात्रीच्या बससेवेलाही प्रतिसाद नाहीच. त्यामुळे दुहेरी नुकसान सोसावे लागत आहे. रस्ते बंद आणि ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असल्याने दिसून येत आहे.
कॅब सेवेवरही परिणाम
कॅबच्या सेवेवरदेखील रस्ते बंद करण्याच्या निर्णयाचा फटका बसला आहे. व्यवसायावर सुमारे 30 टक्के परिणाम झाला आहे. ठिकठिकाणी केलेल्या बॅरिकेडिंगमुळे वाहनांना प्रवेश नाही. त्यामुळे प्रवाशांनी कॅब बुक केली तरी ती प्रवाशांपर्यंत पोहोचतच नाही. याचा फटका कॅबसह प्रवाशांनाही बसत आहे.
दुपारपासूनच रस्ते बंद
कॅबचे बुकिंगही ऐनवेळी रद्द केले जात आहे. त्यामुळे कॅबही नाही आणि पीएमपीही नाही, अशी अवस्था प्रवाशांची झाली आहे. गणेशोत्सवाचा उत्साह ठिकठिकाणी दिसून येत आहे. देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे दुपारपासूनच रस्ते बंद करण्यास वाहतूक पोलिसांनी सुरवात केली आहे. विविध वस्तुंच्या खरेदीसाठी नागरिक पेठांच्या तसेच तुळशीबाग याठिकाणी येत असतात.
नागरिकांची मोठी गैरसोय
दगडूशेठ गणपतीसह मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी इतर जिल्ह्यांतूनदेखील नागरिक पुण्यात येतात. त्यांच्यासाठी कॅब किंवा पीएमपी हा पर्याय सहज उपलब्ध होणार असतो. मात्र आता अशा नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
गौरींच्या विसर्जनानंतर प्रवाशांमध्ये वाढ होण्याची शक्यता
गणेशभक्तांसाठी पीएमपीएमएलने रात्री 10 ते 2 या दरम्यान बससेवा सुरू केली आहे. अद्याप ही सेवा चांगल्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहे. गौरींच्या विसर्जनानंतर प्रवाशांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रात्रीच्या बस सेवेसाठी पीएमपीने 160हून अधिक बस उपलब्ध केल्या आहेत. या बस वाढवल्या जाणार आहेत.