पुणे: येत्या 31 डिसेंबरला पुण्यात होऊ घातलेल्या एल्गार परिषदेला (Elgar Parishad) स्वारगेट पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. कोरोना परिस्थिती आणि रात्रीच्या संचारबंदीचे (नाईट कर्फ्यू) कारण देत पुणे पोलिसांकडून या परिषदेला परवानगी नाकारल्याचे समजत आहे. त्यामुळे आता एल्गार परिषदेचे आयोजक माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील काय भूमिका घेणार, हे आता पाहावे लागेल. (Police deny permission for Elgar Parishad in Ganesh Kala Krida Manch at Swargate)
बी. जी. कोळसे-पाटील यांनी सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करून गणेश कला क्रीडा मंडळामध्ये एल्गार परिषद घेऊ, असे म्हटले होते. त्यासाठी स्वारगेट पोलीस ठाण्यात त्यांनी अर्ज दिला होता. मात्र, पोलिसांनी सध्याच्या परिस्थितीत एल्गार परिषदेला परवानगी देता येणार नाही, असे सांगत हा अर्ज फेटाळून लावला आहे.
डिसेंबर 2017 ला शनिवार वाड्यात एल्गार परिषद पार पडली. त्यानंतर कोरेगाव-भीमाला मोठी दंगल उसळली होती. या दंगलीचा थेट संबंध एल्गार परिषदेशी जोडण्यात आला अन एल्गार परिषदेवर राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर हा तपास एनआयएने ताब्यात घेत देशभरात डाव्या विचारांच्या अनेक बुद्धिजीवींना अटक केली. यावरुन देशभरात डाव्या विचारांच्या लोकांनी मोठं काहूर माजवलं.
या सगळ्या परिस्थितीत इतका वादंग सुरु असताना पोलिसांनी परवानगी देवो, अथवा न देवो यंदाही एल्गारची सांस्कृतिक परिषद होणारच, असा निर्धार बी. जी. कोळसे-पाटील यांनी व्यक्त केला होता.
शहरी नक्षलवादाशी जोडली गेलेली एल्गार परिषद, त्यानंतर बुद्धिजीवींना झालेली अटक यावरुन मोठा गजहब झाला. डाव्या आणि उजव्या विचारांचा हा संघर्ष इतक्या शिगेला पोहोचलाय की आत्तापर्यंत या प्रकरणात देशातील विविध न्यायालयात 118 याचिका दाखल आहेत.
31 डिसेंबरला स्वारगेट येथील गणेश कला क्रीडात दिवसभराची ही परिषद होणार आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह काही कलाकृतींचे प्रदर्शन याठिकाणी लावलं जाईल. जेष्ठ विचारवंत अरुंधती रॉय या परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कोरेगाव भीमा शौर्य दिन अभियान समितीसह 200 ते 300 समविचारी संघटना यात सहभागी होतील. मात्र ब्राह्मण महासंघाने या परिषदेला विरोध दर्शविला आहे. विचार करूनच या परिषदेला परवानगी देण्यात यावी, असं ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
सुप्रीम कोर्टाने परवानगी नाकारली तरी एल्गार परिषद घेऊच; तुरुंग, मरणाला घाबरत नाही: कोळसे-पाटील
(Police deny permission for Elgar Parishad in Ganesh Kala Krida Manch at Swargate)